हल्दवानी : महाराष्ट्राने सलग दुसर्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोनशे पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. 38 व्या स्पर्धेतही द्विशतकी कामगिरी करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मल्लखांबपटू यशाने महाराष्ट्राने 201 पदके जिंकून स्पर्धा गाजवली.
उत्तराखंडातील 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 54 सुवर्णांसह 71 रौप्य, 76 कांस्यपदकांची लयलूट करीत पदकतक्यात महाराष्ट्र दुसर्या स्थानी गेले आहे. गत गोवा स्पर्धेत महाराष्ट्राने 80 सुवर्ण, 67 रौप्य व 79 कांस्य अशी एकूण 228 पदकांची लयलूट करीत ऐतिहासिक कामगिरी केली होती. यंदाही 200 पदकांचा पल्ला महाराष्ट्राने पूर्ण करण्याचा इतिहास घडविला आहे.
स्पर्धेच्या 17 व्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मल्लखांब स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. स्पर्धा समितीने शुक्रवारी सकाळी पदकाचा अंतिम तक्ता जाहीर केला. यामध्ये मल्लखांबमधील 3 कांस्यपदकांमुळे महाराष्ट्राने पदकाचे व्दिशतक पूर्ण केले. शार्दूल हृषिकेश, रिषभ घुबडे व दर्शन मिनियार यांनी महाराष्ट्रासाठी शेवटची पदके जिंकली. त्यापूर्वी अखेरचे सुवर्णपदकही रूपाली गंगावणे हीने पटकावले. मल्लखांबात शार्दूल हृषिकेशने पदकांचा चौकार झळकविला. आदित्य पाटील, सोहेल शेख मृगांक पाठारे यांनीही पदकांची कमाई केली आहे. 4 सुवर्ण, 4 रौप्य व 5 कांस्यपदकांची लयलूट मल्लखांबात महाराष्ट्राने करून विजेतेपदही प्राप्त केले.
तब्बल 27 क्रीडाप्रकारात महाराष्ट्राने पदके जिंकण्याचा कामगिरी केली आहे. जिम्नॉस्टिक्स सर्वाधिक 12 सुवर्णांसह 24 पदके महाराष्ट्राने जिंकली आहेत. महाराष्ट्राने कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दन राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अधयक्ष अजित पवार, क्रीडामंत्री दत्तामामा भरणे, महासचिव नामदेव शिरगावकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.