सातारा : शहरात भरधाव वेगाने चारचाकी चालवून दोन दुचाकींना धडक दिल्याने तिघे जखमी झाल्याची घटना दि. २५ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राजलक्ष्मी टॉकीजजवळ घडली. याबाबत अमर ताराचंद तावरे (वय २८, रा. वृंदावन सृष्टी अपार्टमेंट, प्लॉट नं. २०३, म्हसवे रोड, करंजे, ता. जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी व त्यांचे सहकारी नागेश रामा उप्पर (वय २२, रा. विघ्नहर्ता कॉलनी, कोंडवे, ता. जि. सातारा) हे दुचाकी क्र. एमएच ११ सीव्ही ७७८८ वरून सातारा एसटी स्टँड ते पोलीस मुख्यालयाकडे जात होते. ते गणेश आर्टस दुकानाजवळ आले असता चारचाकी क्र. एमएच ११ डीएच २३०० वरील चालक आदित्य विठ्ठल इथापे (रा. पंताचा गोट, सातारा) याने वाहन भरधाव वेगाने चालवून पुढे जाणाऱ्या दुचाकी क्र. एमएच ११ डीजी ५५७८ ला धडक दिली. त्यानंतर फिर्यादी यांच्या दुचाकीलाही धडक दिली.
या अपघातात फिर्यादी यांना किरकोळ दुखापत झाली असून नागेश उप्पर तसेच पुढील दुचाकीवरील चालक अशा दोघांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी आदित्य इथापे याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.
भरधाव चारचाकीची दोन दुचाकींना धडक; तिघे जखमी, कारचालकावर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 28 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा