सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून परवा जिल्हा परिषदेमध्ये मंत्री आणि आमदारांमध्ये अक्षरशः रणकंदन झाल्याचे पाहायला मिळाले. सातारा जिल्हा परिषदेतील हा अभूतपूर्व राडा पाहून जिल्ह्यातील जनतेने अक्षरशः आपल्या माना खाली घातल्या. "नक्की आपणच यांना निवडून दिले का?" असा प्रश्न लोक स्वतःच्या मनाला विचारू लागले आहेत. भाजप नेत्यांच्या 'डर्टी गेम'मुळे सोशल मीडियावर जिल्ह्यातील लाखो लोकांनी आपले मन मोकळे करत भाजप नेत्यांची अब्रू वेशीवर टांगली आहे. अशा प्रकारचे प्रकार सातारा जिल्ह्यात खपवून घेणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सातारा जिल्हा हा देशाला दिशा देणारा जिल्हा आहे. भारताचे माजी उपपंतप्रधान तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, पोलादी पुरुष बाळासाहेब देसाई, किसनवीर आबा आदी महानुभावांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम केले. सहकार चळवळ याच मातीमध्ये रुजली, स्वातंत्र्यलढ्यातही सातारा जिल्ह्यातील विभूतींनी सहभाग घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम केले. अशा जाज्वल्य वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये मात्र परवा मोठी आगळीक झाली. सत्तेसाठी भाजप नेत्यांनी महायुतीला कोलदांडा घालत प्रशासनाला हाताशी धरून, बहुमत नसतानाही जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापली. सातारा जिल्ह्यामध्ये दरमहा शेकडो गंभीर गुन्हे दाखल होत असतात. या गुन्ह्यांमधील आरोपींना पकडण्यासाठी सातारा पोलीस तत्परता दाखवत नाहीत; मात्र जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या साठमारीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे फ्लोअर टेस्टिंग (मतदान) होऊ नये यासाठी भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी सत्ता स्थापनेच्या पूर्वसंध्येलाच 'फिल्डिंग' लावली आणि सोबत प्रशासन घेतले. अशा भानगडींमध्ये प्रशासन म्हणजेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख सोबत असतील, तर काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्याचे काळे करणे सोपे होते. याच न्यायाने परवाचा हा 'डर्टी गेम' घडवून आणला गेला.
जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, संदीप मांडवे आणि कामेश कांबळे हे भाजपचे 'टार्गेट' होते. खबरदारी म्हणून शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी आपले सदस्य यापूर्वीच अज्ञातस्थळी ठेवले होते. भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ची पुरेपूर कल्पना असल्याने त्यांनी ही खबरदारी घेतली होती. परंतु, काहीही करून 'साम-दाम-दंड-भेद' वापरून सातारा जिल्हा परिषदेवर सत्ता आणायचीच, असा चंग भाजपेयींनी बांधला होता. अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना जिल्हा परिषदेच्या दारावरच रोखण्यासाठी त्यांच्यावर आदल्या रात्री महाबळेश्वर पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपेयींच्या अंदाजानुसार अनिल देसाई आणि संदीप मांडवे ठरल्याप्रमाणे पालकमंत्र्यांच्या गाडीतून जिल्हा परिषदेत दाखल झाले. हुकमाचे ताबेदार असणाऱ्या सातारा पोलिसांनी लागलीच आपली 'कर्तव्य तत्परता' दाखवत या दोघांनाही ताब्यात घेतले.
अशी अभूतपूर्व भानगड सातारा जिल्हा पहिल्यांदाच पाहत होता. साताऱ्यातील माध्यमकर्मी हा अभूतपूर्व सोहळा सोशल मीडियाद्वारे 'लाईव्ह' दाखवत होते. स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम समजणारे साताऱ्यातील मंत्री, स्वतःच्या बाह्या सरसावून या कळवंडीमध्ये सामील झाले होते. विधिमंडळामध्ये मांडीला मांडी लावून बसणारे आज एकमेकांचे जानी दुश्मन झाले होते. साताऱ्यातील लोक एकेकाळी अभिमानाने म्हणायचे, "आमच्या जिल्ह्यात चार मंत्री आहेत, आता जिल्ह्याचा विकास फुटा-फुटाने नव्हे तर किलोमीटरने होणार!" परंतु कसले काय? सार्वजनिक बांधकाम खाते भूमिपुत्राकडे असूनही सातारा जिल्ह्यातील खड्डे मात्र सातारकरांच्या मणक्यांचा वेध घेत आहेत.
असो, 'विकास' नावाची व्यक्ती सातारा जिल्ह्यातून केव्हाच हद्दपार झालेली आहे. आता उरली आहे ती फक्त राजकीय साठेमारी. यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर अण्णांच्या विचारांना हरताळ फासून जिल्ह्यातील भाजप नेते आणि मंत्र्यांनी आपली 'लायकी' जिल्ह्याला दाखवून दिली आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडून आणला खरा; परंतु गेल्या अडीच वर्षांत जिल्ह्यात महायुतीचे चार मंत्री असूनही विकासाचा वनवास संपलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापून भाजप अजून काय नवीन दिवे लावणार? असा प्रश्न जनता विचारत आहे. "जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवावा" ही 'देवाभाऊंची' इच्छा साताऱ्याच्या धाकट्या छत्रपतींनी आणि माण-खटावच्या गोरेंनी पूर्ण केली असली, तरी परवा झालेली कळवंड नीतिमत्तेला धरून नव्हती. सामान्य जनतेला हलक्यात घेतल्यावर काय होते, याची प्रचिती इतर राज्यांतील निकालांतून स्पष्ट झालेली आहे. या पृथ्वीतलावर कोणीही अमरपट्टा बांधून आलेले नाही. सत्ता येते आणि जाते, परंतु नीतिमत्ता सोडू नये, असे जाणकार सांगतात. परंतु, साताऱ्यातील अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या भाजपेयींना हे सांगणार कोण? एकूणच परवाचा 'इव्हेंट' पुरता 'बेक्कार' होता. सत्तेच्या आणि विजयाच्या उन्मादात लोळणाऱ्या भाजप नेत्यांची सोशल मीडियावर मात्र 'छी-थू' सुरू आहे. २०१४ साली याच सोशल मीडियाचा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यात सिंहाचा वाटा होता, हे विसरता कामा नये; अन्यथा उन्मादात वागणाऱ्यांचा येणाऱ्या काळात 'कपाळमोक्ष' अटळ आहे.
खा. उदयनराजेंची कॉलर मात्र टाईट...
सातारा जिल्हा परिषदेच्या 'डॉग फाईट'मध्ये भाजपने बाजी मारली खरी; मात्र या भानगडीत जिल्ह्याचे खासदार उदयनराजे कुठेच नव्हते. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या नादात मंत्री, आमदार आणि नेते 'कमरेचे सोडून डोक्याला बांधणार', याची पुरेपूर कल्पना असल्याने त्यांनी यापासून चार हात लांब राहणेच पसंत केले. ज्या मंत्र्यांना आणि नेत्यांना जनतेने 'वैचारिक प्रगल्भ' म्हणून पाहिले होते, तेच नेते इतके उथळ निघाले याचे अनेकांना दुःख झाले. मात्र, या सर्व संघर्षात उदयनराजे तटस्थ राहिले. त्यामुळे ज्या सामान्य माणसाने त्यांना मतदान केले, तो सुखावला आहे. शिवछत्रपतींच्या घराण्याची 'गरिमा' राखण्याचे खरे काम उदयनराजेंनी केले. "उदयनराजे, आप ग्रेट हो!" अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या असून, या राजकीय साठेमारीत खासदारांची 'कॉलर' मात्र टाईट राहिली आहे.