कोयनानगर : गत चार महिन्यात कोयना धरणातून पश्चिम वीजनिर्मितीसाठी 13.77, पुरकाळातील 13.72 अशा 27.49 टीएमसी पाण्यावर वीजनिर्मिती करून तर 61.89 टीएमसी पाणी विनावापर व 2.69 टीएमसी बाष्पीभवन अशा 64.58 टीएमसी व एकूण 92.07 टीएमसी पाण्यानंतरही सध्या धरणात तब्बल 103.84 टीएमसी पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्यामुळे भविष्यातील सिंचनासह वीजनिर्मितीची चिंता मिटली आहे.
एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक जल वर्षापैकी मुख्य पावसातील चार महिन्यांचा कालावधी संपला आहे. या पावसाळ्यात 173.21 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. एक जून रोजी नवीन जल वर्षारंभाला 23.12 टीएमसी शिल्लक पाणीसाठ्यावर कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षाला सुरुवात झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत सरासरी 800 मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली असली तरी जादा पाण्याची आवक व जादा पाणीवापरही झाला आहे.
या जलवर्षात पहिल्या चार महिन्यांत 173.21 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणात 103.84 टीएमसी पाणी शिल्लक आहे. या चार महिन्यात कोयना 4706 मिलिमीटर, नवजा 5954 मिलिमीटर, महाबळेश्वर 5681 मिलिमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे. सिंचनासाठी अद्याप पाणीवापर झाला नाही तर वर्षभरात पश्चिम वीजनिर्मितीसाठी लवादाचा 67.50 टीएमसी पाणी कोटा आरक्षित असतो. त्यापैकी आतापर्यंत 13.77 टीएमसी पाणीवापर झाल्याने आगामी आठ महिन्यांसाठी 53.73 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी लागणार आहे.