खटाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेत डिस्कळ (ता. खटाव) येथील दीपाली दशरथ कर्णेने राज्यात पहिली, तर देशात २४ वी रँक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले आहे. शेतकरी कुटुंबातील रूपाली आणि दीपाली या दोन्ही जुळ्या मुली आयएसएस अधिकारी झाल्याने सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा प्रवास सर्वांना प्रेरणा देणारा आहे.
दीपालीचे प्राथमिक शिक्षण डिस्कळ, तर माध्यमिक शिक्षण श्री यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये झाले. दीपालीचे वडील दशरथ कर्णे हे यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज सोळांकूर (ता. राधानगरी) येथे सेवक म्हणून कार्यरत आहेत. आई गृहिणी असून, घरची सर्व शेती सांभाळते. भाऊ योगेश यांचे पुसेगाव व डिस्कळ येथे स्वतःचे कोचिंग क्लास आहेत. बहीण रूपाली या भारतीय सांख्यिकी सेवा या विभागात आयएसएस अधिकारी आहेत. वडील दशरथ व बंधू योगेश हे शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळे दीपालीने भरपूर शिकावे व प्रशासकीय अधिकारी बनावे, हे दोघांचे स्वप्न होते.
सोळांकूर, उच्च माध्यमिक शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुरगुड येथे झाले. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजमधून बीएस्सी व एमएस्सी झाले. ग्रामीण भागातील मुलींना अनेक बंधने असतात. घरकामात मदत करणे, स्वयंपाक बनवणे यासारख्या विविध कामात त्यांना अक्षरशः जुंपले जाते. मात्र, रूपाली आणि दीपालीला त्यांच्या कुटुंबीयांनी अभ्यासासाठी मोकळीक दिली होती.
दीपालीला सुरुवातीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले. त्यानंतर दीपालीने प्रत्येक दिवस, आठवडा व महिन्याच्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्मपद्धतीने नियोजन केले. याकामी योगेश व बहीण रूपाली यांची खूप मदत झाली. जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर दीपालीने पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. वयाच्या २८ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तिने आपले आयएसएस होण्याचे स्वप्न साकार केले. शेतकरी कुटुंबातून येऊन क्लास वन अधिकारी बनण्याचा तिचा प्रवास सर्वांना प्रेरणा देणारा आहे.
डिस्कळची रूपाली कर्णे ही २०२१ मध्ये आयएसएस अधिकारी बनली. रूपालीचा आदर्श घेत तिची जुळी बहीण दीपालीनेही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. या जुळ्या बहिणींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केल्याने कर्णे कुटुंबावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.