सातारा : साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. ज्या प्रमाणे साहित्य संमेलनाच्या नावाचा आणि बोधचिन्ह असलेला फुगा आकाशात उंचचउंच भरारी घेत आहे, त्याप्रमाणेच सातारा येथे होत असलेले संमेलन गुणवत्तेची उंची गाठेल असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रतिक (आकाश फुगा) आज (दि. २८) नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते शाहू स्टेडियम येथे होत असलेल्या संमेलनस्थळावरून सोडण्यात आले. त्या वेळी प्रा. मिलिंद जोशी बोलत होते. महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, महामंडळाचे कोषाध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, शतकपूर्व संमेलन आयोजित करण्याचा मान साताऱ्याला मिळाला आहे. स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलानाच्या तयारीला गती आली आहे. संमेलनाचे नाव व बोधचिन्ह असलेला आकाश फुगा सातारा शहरातील कुठल्याही स्थानातून नागरिकांना दिसू शकणार आहे, त्यामुळे हा उपक्रम सातत्याने लोकांच्या नजरेसमोर राहिल. संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यासाठी हा उपक्रम फलदायी ठरणार आहे.
या वेळी बोलताना सुनिताराजे पवार म्हणाल्या, संमेलनाच्या निमित्ताने विचारांचे आदानप्रदान होत विचारांची गुढी या आकाश फुग्याप्रमाणेच उंच-उंच जाईल. वैचारिक देवाण-घेवाणीचे, गर्दीचे तसेच पुस्तकविक्रीचेही विक्रम या संमेलनात मोडले जातील. आजपर्यंत झालेल्या संमेलनातील यंदाचे संमेलन विक्रमी संमेलन ठरेल, असा विश्वास आहे.
विनोद कुलकर्णी म्हणाले, संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सातारचे प्रथम नागरिक, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते संमेलनाच्या नावाचा आणि बोधचिन्हाचा आकाश फुगा आकाशात सोडलेला आहे. फुगा उंचचउंच जात आहे. नगराध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर मोहिते यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. निवडणुकीत मोहिते यांना विक्रमी यश मिळाले तसेच यश ९९व्या साहित्य संमेलनाला निश्चितच मिळेल. विक्रमी यश मिळविणारे हे संमेलन शतकपूर्व आहे. संमेलनाचा असंख्य साहित्यप्रेमी लाभ घेतील, अशी खात्री आहे.