घरफोडी प्रकरणातील आरोपीला वाठार पोलिसांनी जेरबंद; सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त; पाच वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर होता संशयित

by Team Satara Today | published on : 23 May 2026


वाठार  स्टेशन :  वाठार पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाठार पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सोनके (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३४ (४) व ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी डीबी पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपीचा माग काढण्यात आला. संबंधित आरोपी हा यापूर्वीच्या एका गुन्ह्यातही पोलिसांना हवा होता. त्याला ताब्यात घेऊन विश्वासात विचारपूस केली असता त्याने सोनके येथील घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोउनि. गहिनीनाथ सातव, नितीन भोसले, पोहवा उदय जाधव, जितेंद्र शिंदे, आनंदराव भोसले, अमोल कर्णे, किशोर गिरी, दीपक साबळे, प्रकाश चव्हाण, सहदेव तुपे, विठ्ठल काळे, प्रतिक देशमुख, प्रकाश मेळावणे, विजय ढाणे, माणिक कोळपे तसेच महिला पोलीस कर्मचारी दीपाली गुरव, माधुरी दीक्षित, आशा देशमुख व पूजा जगताप यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहवा उदय जाधव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटीला ओलांडताना आरे दरेच्या युवकाचा जीव गेला; बोगदा-परळी मार्गावर हृदयद्रावक अपघात
पुढील बातमी
वर्धनगडाच्या पायथ्याशी असलेल्या रामोशीवाडीत वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

संबंधित बातम्या