मुंबई: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर जागतिक राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. तब्बल ४० मिनिटे चाललेल्या या संभाषणात ट्रम्प यांनी मोदींना आपला विशेष 'मेगा प्लॅन' सांगितल्याची माहिती समोर येत असून, इराण युद्ध आणि भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांवर यावेळी विशेष भर देण्यात आला.
अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये आयोजित केलेली चर्चेची पहिली फेरी कोणतीही निष्पन्न न होता संपली. या अयशस्वी चर्चेनंतर ट्रम्प यांनी तातडीने पंतप्रधान मोदींना फोन केल्याने या संवादाला मोठे राजनैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात या दोन जागतिक नेत्यांमधील ही दुसरी दूरध्वनी चर्चा आहे. आता चर्चेची दुसरी फेरी येत्या १६ एप्रिल रोजी इस्लामाबाद किंवा जिनेव्हा येथे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, युद्धविरामाची मुदत संपण्यापूर्वी तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त यांसारखे देश मध्यस्थी करत आहेत. संयुक्त राष्ट्रांनीही हा संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रह धरला आहे.
या सर्व घडामोडींवर भाष्य करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराण पुन्हा एकदा चर्चेसाठी उत्सुक असून तसा संदेश इराणकडून देण्यात आला आहे. इराण अमेरिकेसोबत नवीन करार करण्यासाठी तयार असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे असले, तरी इराण सर्व अटी मान्य करत नाही तोपर्यंत कोणताही करार होणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली आहे. इराणकडे कधीही आण्विक शस्त्रे असणार नाहीत, असा पुनरुच्चारही ट्रम्प यांनी यावेळी केला.
दुसरीकडे, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाशी संपर्क साधून भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढता तणाव पाहता रशियानेही आता शांततेसाठी पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, इराणने आता शांतता चर्चेसाठी एक नवी अट घातली असून, सौदी अरेबिया, यूएई, कतार, बहारिन आणि जॉर्डन या देशांकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अमेरिकेला साथ देणाऱ्या या देशांनी इराणच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी आक्रमक भूमिका इराणने घेतल्याने या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. या गुंतागुंतीच्या परिस्थितीत भारत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.