सातारा : निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदार यादीतील तक्रारी आणि MPSC परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात युनायटेड युथ फ्रंट ऑफ सातारा यांच्या वतीने शुक्रवारी पोवई नाका येथे ‘HIT THE STREETS’ मोर्चा काढण्यात आला. लोकशाही, संविधानिक अधिकार आणि परीक्षांमधील पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर विद्यार्थी व युवकांनी आवाज उठवला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, मतचोरीच्या आरोपांसह निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, तसेच SIR प्रक्रिया रद्द करावी, अशा मागण्या आंदोलकांनी मांडल्या. या प्रक्रियेत वगळलेल्या पात्र मतदारांची नावे पडताळणी करून पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणीही करण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांशी संबंधित कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या प्रकरणांची चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पुण्यात MPSC विद्यार्थी परीक्षांमधील पारदर्शकता आणि आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या संघर्षाला साताऱ्यातील विद्यार्थ्यांनी पाठिंबा द्यावा आणि राज्यभरातील युवकांनी एकजूट दाखवावी, हा मोर्चाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
‘राज्यक्रांती — जनतेच्या आवाजाची हाक’ या घोषवाक्याखाली झालेल्या आंदोलनातून लोकशाहीत प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार असल्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि घटनात्मक अधिकारांसाठी शांततापूर्ण मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहन युनायटेड युथ फ्रंट ऑफ सातारा यांनी केले.
‘विद्यार्थी एकजूट, लोकशाही आणि संविधानाचा विजय’ असा निर्धार व्यक्त करत युवकांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी साताऱ्यात युनायटेड युथ फ्रंटचा एल्गार! SIR रद्द करण्यासह MPSC गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी; पुण्यातील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा
by Team Satara Today | published on : 09 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा