माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांना जिल्हा कॉंग्रेस व दिव्यांग संघटनेतर्फे आदरांजली

by Team Satara Today | published on : 14 August 2026


सातारा : माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटी आणि राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शुक्रवारी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

स्व. विलासराव देशमुख यांनी सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करत सर्वसामान्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्यकाळात दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासाठी तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध धोरणात्मक निर्णय आणि कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या, असे यावेळी सांगण्यात आले.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क सवलत, शासकीय सेवेत दिव्यांगांसाठी आरक्षणाची अंमलबजावणी, स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साहित्याचे वाटप तसेच व्यावसायिक प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांना स्व. विलासराव देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना, दिव्यांगांसाठी 200 चौरस फुटांचा भूखंड उपलब्ध करून देणे, एसटी बस प्रवासासाठी सवलतीचा पास, बीज भांडवल व मासिक अनुदान यांसारख्या मागण्यांना त्यांनी मान्यता दिल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातही राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या विविध प्रश्‍नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. जयपूर फूट, कॅलिपर्स, कुबड्या, तीनचाकी सायकली, वॉकर, श्रवणयंत्र आदी साहित्याचे वाटप, मार्गदर्शन मेळावे, आंदोलने, उपोषणे तसेच शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली आहे. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध शासकीय समित्यांवर काम करून प्रश्‍न मार्गी लावण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

स्व. विलासराव देशमुख यांचे संवेदनशील नेतृत्व, सर्वसमावेशक विचार आणि दिव्यांगांसह दुर्लक्षित घटकांसाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. अशी माहिती सातारा जिल्हा दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष सुरेश इंगवले यांनी दिली यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुषमा राजे घोरपडे, माजी जिल्हाध्यक्षा रजनी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘सेवा अभियान’च्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्‍नांना गती : जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले, जिल्ह्यात सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुढील बातमी
‘भारत माता की जय, वंदे मातरम’ने दुमदुमली सातारानगरी ; ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज रॅली उत्साहात

संबंधित बातम्या