गुरसाळेतून मराठा आंदोलकांसाठी पाच हजार भाकरी

by Team Satara Today | published on : 02 September 2025


सातारा  : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी राज्यातील लाखो समाजबांधव उपस्थित आहेत. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ते लढत आहेत. त्यांना एक छोटीशी मदत म्हणून खटाव तालुक्यातील गुरसाळे गावाने ‘एक घर एक शिदोरी’ची हाक दिली. रविवारी सर्व शिदोऱ्यांचे संकलन करून मराठा क्रांती मोर्चाचे युवक मुंबईकडे रवाना झाले.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू झाल्यापासून क्रांतिकारी ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील सर्व मराठा समाजबांधवांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले समाजबांधव जमा झाले आहेत. त्यासाठी त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेत आपलाही हातभार असावा म्हणून शनिवारी गुरसाळे गावातील पदाधिकाऱ्यांनी गावातील ग्रुपद्वारे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व गावकऱ्यांनी प्रत्येकी पाच भाकरी, ठेचा, लोणचे, शेंगदाणा चटणी एका कापडात व्यवस्थित बांधून गावात एका ठिकाणी जमा केली.

सर्वसाधारणपणे पाच हजार भाकरी जमा झाल्या असून, व्यवस्थितपणे एका पिकअप वाहनात शिदोरी भरण्यात आली. दहा ते बारा युवक त्या गाडीत बसून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे आजूबाजूच्या गावांत कौतुक होत आहे. त्यांनीही आता तयारी सुरू केली आहे. खटाव तालुक्यात यानिमित्ताने उपोषणस्थळी मदतीची सुरुवात झाली आहे. हे आंदोलन मोठ्या ताकदीने सुरू राहून व आपल्या मराठा समाजबांधवांना न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे. मोठ्या आशेने समाज या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे.

म्हासुर्णे (ता. खटाव) येथील महंमद शेख, मैनुद्दीन शेख, शाहरुख शेख यांच्याकडून उपोषणस्थळी पाण्याचे १०० बॉक्स देण्यात आले आहेत. शक्य होईल तेवढी मदत करणार असल्याचे इंजिनिअर मैनुद्दीन शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कराडवरून पुरणपोळीचा घास!

कराड : सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गौराईही घरी आल्या आहेत. तरीही लाखो मराठा आंदोलक मुंबईत मराठा आरक्षणासाठी, मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत ठिय्या मांडून बसले आहेत. या आंदोलकांची जेवणाची गैरसोय होऊ नये. आपण सणाला घरी नाही, याची आठवण होऊ नये म्हणून कराड तालुक्यातील हजारो भगिनींनी घरी केलेल्या पुरणपोळ्यांचा घास सोमवारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खास मुंबईला पाठविला आहे. हा मायेचा घास आंदोलकांना बळ देईल, असे मत माता-भगिनी व्यक्त करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इमारतीवरून पडल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यू
पुढील बातमी
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

संबंधित बातम्या