सातारा - मातोश्री भिमाई पुरस्कार हा स्त्री चळवळीत संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान आहे. मी माझा हा पुरस्कार अशा स्त्रियांना अर्पण करते. पुरस्काराची दहा हजार रुपयाची रक्कम समाजात शांती व सलोखा निर्माण करण्यासाठी स्थापन केलेल्या स्त्री -संघर्ष मंचच्या संस्थेस देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला दहा वर्षे झाली तरी न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. विवेकी विचारासाठी संघर्ष करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांचे खून व हल्ल्या पाठीमागे समाजात दहशत पसरवण्याचा हेतू आहे. या कट कारस्थानाचे मुख्य सूत्रधार पकडण्यात तपासी यंत्रणा अपयशी ठरली आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी स्थापन केलेल्या श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूरच्या विश्वस्त, शिवाजी विद्यापीठ विदेश भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी व्यक्त केली.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. मेघा पानसरे यांना मातोश्री भीमाबाई आंबेडकर २७ वा पुरस्कार श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते शानदार समारंभात देऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे संघटक व माजी अध्यक्ष दिनकर झिंब्रे, सहकार्यवाह डॉ. सुवर्णा यादव , कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे,विश्वस्त डॉ. जयपाल सावंत उपस्थित होते.
डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या, बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश दिला पण आपण बुद्ध, बाबासाहेब, फुले नीट शिकलो नाही. भारतीय राज्यघटना व बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म नीट समजून घेण्याची गरज आहे. तेच बौद्धांच्या अंतर्गत मोठे आव्हान आहे. आजची परिस्थिती संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारी अतिशय वाईट आहे. शिक्षण व्यवस्था पोखरली आहे. मूल्य व्यवस्था ढासळली आहे. स्वार्थी आत्मकेंद्री विचार समाजात निर्माण करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. पुरोगामी चळवळ लोकांपासून तुटली आहे. तरुणांना वैचारिक अधिष्ठान व नवा पर्याय देण्यासाठी प्रबोधन होणे अतिशय आवश्यक आहे. अन्यायाविरोधी लढण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर होण्याची आवश्यकता आहे.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान नीट समजून घेण्याची गरज आहे. भारतीय नागरिकांना मत देण्याचे स्वातंत्र्य मिळाले पण आर्थिक व सामाजिक समता अजूनही प्रस्थापित झालेली नाही. बुद्ध, फुले, बाबासाहेब यांचे विचार मान्य नसणाऱ्या कडून त्यांच्या पूजेचे ढोंग केले जात आहे. विषमतावादी मनुस्मृति बाबासाहेबांनी जाळली. या देशात मनूचे पुतळे उभे केले जातात. मनुस्मृती जाळायची नाही अशा प्रकारची घोषणा करणारे लोक आता पुढे येऊ लागले आहेत. ही अस्वस्थ करणारी बाब आहे. मनुवादाविरुद्ध लढण्याचे मोठे आव्हान आहे. नाशिकमध्ये वृक्षतोड कोणासाठी होत आहे.
याप्रसंगी संबोधी प्रतिष्ठानच्या कार्याला बहुमोल आर्थिक सहकार्य करणारे संस्थेचे विश्वस्त अनिल बनसोडे व भास्कर फाळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक रमेश इंजे यांनी केले. डॉ. जयपाल सावंत व डॉ. सुवर्णा यादव यांनी सूत्रसंचालन केले. दिनकर झिंब्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यशपाल बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विश्वस्त प्राचार्य संजय कांबळे, संबोधी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर व सजग नागरिक उपस्थित होते.
साताऱ्यात छत्रपती शाहू व भिमाईचे गौरवशाली स्मारक व्हावे
छत्रपती संभाजी पुत्र शाहू महाराजांच्या शौर्याला साजेसे गौरवशाली व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाई यांचे प्रेरणादायी स्मारक सातारा शहरात झाले पाहिजे, असे मत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले.