जिल्ह्यात पावसाची संततधार

by Team Satara Today | published on : 26 May 2025


सातारा : गेल्या आठवड्यापासून सातारा जिल्ह्यात सर्वत्रच कमी अधिक पाऊस सुरु आहे. रविवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरीही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. साताऱ्यात पावसाने थोडी उसंत दिल्याने पावसाळी खरेदीसाठी बाजार पेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत होती. पडझडीच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पुर्वेकडील विशेषत: माण, खटाव या दुष्काळी भागात कोसळधार पाऊस सुरु असल्याने छोटे ओढे दुधडी भरुन वाहू लागले तर तलावातही पाणी मोठ्या प्रमाणात आले होते.

जिल्ह्यात ११ अंशत: घरांची पडझड झाली आहे. तर दोन विहिरी खचल्या आहेत. अद्यापही पाच रस्ते वाहतूकीकरता बंद झालेले आहेत. फलटण तालुक्यात १६३.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर मंदावल्याने पावसाळी पर्यटन वाढले आहे.

गेल्या आठवडाभर जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस पडत आहे. अगदी दुष्काळी माण, खटावमध्येही ओढे, नाले भरुन वाहू लागले आहे. अतिपावसाच्या तालुक्यामध्ये पावसाचा जोर होता. शनिवारी पावसाचा जोर मंदावला गेला असून रविवारीही सातारा शहर व परिसरात पावसाने थोडीशी उसंत घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत पावसाळी खरेदी करण्यासाठी सातारकर बाहेर पडले होते. सुरु असलेल्या पावसामुळे पडझडीच्या आकडेवारीत वाढ होत आहे. जिल्ह्यात सहा मंडलात जास्त पाऊस झाला असून ११ अंशत: घरांची पडझड झाली आहे. तर अद्यापही ५ रस्ते वाहतूकीकरता बंद ठेवले गेले आहेत. दोन विहिरी खचल्या आहेत.

फलटण तालुक्यातील फलटण शहरात १६३.५ मिलीमीटर सर्वात जास्त नेंद झाली आहे. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील आसू ७७ मिलीमीटर, वाठार १३५.३ मिलीमीटर, बरड ९८.८ मिलीमीटर, राजाळे १0४.८ मिलीमीटर, कोळकी १0२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर तालुकानिहाय झालेल्या पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये सातारा १६.९, जावली १२.१, पाटण २२.२, कराड २१.९, कोरेगाव ४३.0, खटाव ३३.५, माण ३३.६, फलटण ८५.३, खंडाळा ३४.९, वाई १९.९, महाबळेश्वर १६.0, अशी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा जोर कमी झाल्याने पावसाळी पर्यटन करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. कास, ठोसेघरसह परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर रविवारी जाताना दिसत होते. अशा ठिकाणी हुल्लडबाजी करणारे तरुण धिंगाणा करताना दिसत होते. त्यांच्यावर सातारा पोलीस कारवाई करताना पहायला मिळत होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र समाजासाठी प्रेरणादायी : ना. शिवेंद्रसिंहराजे
पुढील बातमी
पाटणकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

संबंधित बातम्या