एन्काऊंटरमधील लखन भोसलेवर अंत्यसंस्कार

by Team Satara Today | published on : 02 September 2025


सातारा : शिक्रापूर, जि.पुणे येथे शनिवारी सायंकाळी कुख्यात गुंड व कोयता गँगचा म्होरक्या लखन भोसले याचा सातारा शहर पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर पुणे येथील ससून रूग्णालयात शवविच्छेदन झाले. भोसले कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी रात्री जयरामस्वामी वडगाव ता. खटाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. 

सातारा शहर पोलिस शनिवारी सायंकाळी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी लखन भोसले याचा शोध घेत शिक्रापूर येथे गेले होते. पाच पोलिसांच्या पथकाने प्रथम अमर केरी याला पोलिसांनी पकडले. मात्र लखन भोसले पोलिसांना पाहून पळू लागला. त्याचा पाठलाग सुरु केल्यावर लखन भोसले याने दोन पोलिसांवर धारदार शस्त्राने वार केले. यामुळे पोलिस हवालदार सुजित भोसले यांनी सहकारी पोलिसांवर आणखी वार होवू नये, यासाठी पिस्टलमधून गोळी झाडली. यात लखन गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

रविवारी व सोमवारी मृतदेहाचे ससून हॉस्पिटल, पुणे येथे संपूर्ण मृतदेहाचे स्कॅनिंग करुन त्यानंतर शवविच्छेदन केले. सोमवारी दुपारी 4 वाजता लखन भोसले याचा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात दिला. मृतदेह जयरामस्वामी वडगाव या मूळ गावी आणला त्यावेळी मोठ्या संख्यने जमाव असल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. याच परिस्थितीत लखनवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी दुपारी लखन भोसले याचा मृतदेह कुटुंबियांकडे दिल्यानंतर तो रुग्णवाहिकेतून जयरामस्वामी वडगाव येथे रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास पोहचला. या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास दफनविधी पार पडला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
पुढील बातमी
इतिहास, भूगोल आणि प्रेरणादायी वारसा : किल्ले शिवनेरी

संबंधित बातम्या