स्वप्नातील घर साकारण्यासाठी 'रचना २०२६' वास्तू प्रदर्शनाला अवश्य भेट द्या : रवींद्र त्यागी

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 'रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२६' चे शानदार उद्घाटन संपन्न

by Team Satara Today | published on : 27 November 2026


​सातारा : पश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण असणाऱ्या 'रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२६' या भव्य बांधकाम विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन ढोल-ताशांच्या निनादात, शिंग-तुताऱ्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नॅशनल प्रेसिडेंट रवींद्र त्यागी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
​बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) सातारा शाखेच्या वतीने पोलीस परेड मैदानावर दि. २६ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला बीएआयचे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट महेश मुद्दा, महाराष्ट्र स्टेट चेअरमन प्रकाश मेंडा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले, सातारा सेंटर चेअरमन कौस्तुभ मोरे, व्हाईस चेअरमन हर्षद वालावलकर, सेक्रेटरी निलेश शिंदे, खजिनदार शरद जाधव, कौन्सिल मेंबर संतोषकुमार जगताप, सचिन देशमुख, रामदास जगताप, स्कॉन इन्फ्रा प्रिस्ट्रेस एलएलपीचे अनिकेत कंक, कंग्राळकर असोसिएट्सचे चेअरमन श्रीधर कंग्राळकर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चीफ मॅनेजर संजू जिलेंदर, उत्थान एलिवेटरचे वैभव सकुंडे, नवनिर्मितचे विकास जाधव, परफेक्ट हाऊसचे अक्षय साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रदर्शनाला सदिच्छा भेट देऊन संयोजकांना शुभेच्छा दिल्या.
​उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना रवींद्र त्यागी म्हणाले की, स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी पुढील काळात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या अर्थात 'अॅफोर्डेबल हाऊसेस'च्या संकल्पनेवर अधिक भर द्यावा. बीएआयच्या सातारा सेंटरचे कार्य नेहमीच कौतुकास्पद राहिले असून, साताऱ्यासारख्या शहरात 'रचना' सारख्या भव्य वास्तू प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करून या टीमने देशभरात नावलौकिक मिळवला आहे. बीएआय सातारा सेंटरची टीम ही देशातील सर्वात तरुण टीम आहे. आजच्या घडीला केवळ शहरांच्या विकासाचा विचार न करता ग्रामीण भागाच्या विकासासाठीही बिल्डर्स असोसिएशनच्या सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
​बीएआय सातारा शाखेचे अध्यक्ष कौस्तुभ मोरे यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाची माहिती दिली. सातारा जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला भूषणावह ठरेल असे या प्रदर्शनाचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले. भव्य मंडप, आकर्षक प्रवेशद्वार, आधुनिक प्रकाशयोजना आणि विविध सुसज्ज स्टॉल्समुळे हे प्रदर्शन दिमाखदार झाले आहे. 'रचना'च्या यशस्वी आयोजनाचे हे १४ वे वर्ष असून नागरिकांकडून या उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या प्रदर्शनाला चार लाखांहून अधिक नागरिक भेट देतील आणि त्यातून ५० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल होईल, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला.
​समारंभात बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष कौस्तुभ मोरे, उपाध्यक्ष हर्षद वालावलकर, सेक्रेटरी निलेश शिंदे आणि खजिनदार शरद जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर सर्व मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सची पाहणी करून प्रकल्पांची माहिती घेतली. या सोहळ्याला मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, बारामती, इचलकरंजी, फलटण, पंढरपूर आणि इतर शहरांतील बीएआयचे पदाधिकारी, सातारा सेंटरचे सदस्य, महिला विंग 'स्फूर्ती'च्या सर्व सदस्या व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर भोसले यांनी केले, तर सेक्रेटरी निलेश शिंदे यांनी आभार मानले. या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य असून नागरिकांनी सहकुटुंब आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन सातारा शाखेतर्फे करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जगताप कॉलनीत स्थानिक गुन्हे शाखेचा सापळा; पिस्तूल व काडतुसासह कोडोलीचा तरुण गजाआड

संबंधित बातम्या