सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष व साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासण्याचा आणि धमकावत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार शनिवारी संमेलनस्थळीच झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात हे शतकपूर्व साहित्य संमेलन अत्यंत दिमाखदार पद्धतीने सुरू आहे. भाषा प्रेमींच्या अलोट गर्दीने संमेलन स्थळाला कुंभमेळ्याचे स्वरूप आले आहे. संमेलनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी प्रकाशन मंच या दालनात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आटोपून बाहेर पडत असतानाच दुपारी एकच्या सुमारास अचानकपणे हल्लेखोराने तू संमेलन घेतोच कसे अशी दमदाटीची भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी देत विनोद कुलकर्णी यांच्यावर झडप घातली. त्यांच्या तोंडाला काळे फासले. त्यानंतर त्याने लगेच राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. त्यामुळे संविधानाचा आदर म्हणून कोणी त्याच्यावर प्रतिहल्ला केला नाही. या घटनेत विनोद कुलकर्णी यांच्या डोळ्यात रसायन गेल्यामुळे इजा पोहोचली. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
ही घटना अचानकपणे घडल्यामुळे संमेलनस्थळी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन काळे फासणाऱ्या प्रज्ञासूर्य सामाजिक संस्थेचा अध्यक्ष संदीप जाधव (वय ४२, रा. तांदूळवाडी, ता. कोरेगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मातृभाषेच्या सेवेसाठी प्रसंगी प्राणाचा त्याग करू
प्रकाशन कार्यक्रम आटोपून प्रकाशन मंचातून बाहेर पडत असतानाच हा प्रकार घडला. संमेलन होऊ देणार नाही, तुला संपवणार असे म्हणत हल्लेखोराने हा हल्ला केल्याचे विनोद कुलकर्णी यांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. तथापि, मी असल्या भ्याड हल्ल्याला भीक घालत नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी माझे विविध मार्गातून प्रयत्न सुरू आहेत. मी मराठी भाषेचा सच्चा सेवक असून यामध्ये कोणतीही तडजोड नाही. प्रसंगी प्राण गेला तरी बेहत्तर, मराठी भाषेसाठी संघर्ष करण्याचे कधी सोडणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. हिंदी भाषासक्ती आणि साहित्य क्षेत्रामध्ये राजकारणाचा हस्तक्षेप असू नये अशा दोन मुद्द्यावर माझी संघर्षाची भूमिका आहे. कदाचित या संदर्भाने संमेलन उधळण्याचा काही जणांचा प्रयत्न असावा. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने फारसे काही घडले नाही. असे काही घडेल याची कल्पना नव्हती. या प्रकरणाच्या तळाशी पोलीस नक्कीच जातील. त्यांच्या तपास यंत्रणेवर माझा विश्वास आहे असे ते म्हणाले.
दरम्यान, या प्रकाराचा सर्व साहित्यप्रेमींनी निषेध केला असून असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.