सातारा : येथील आझादनगर परिसरातील मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे उभारलेले पत्र्याचे शेड सातारा नगरपालिकेने मंगळवारी दुपारी जमीनदोस्त केले. सुमारे सहा गुंठे क्षेत्रफळाच्या या जागेवर बगीचासाठी आरक्षण असतानाही अतिक्रमण करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली.
सदर शेड श्री. अडसूळ यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात होते. यापूर्वी नगरपालिकेकडून नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलले.
मुख्याधिकारी विनोद झळक यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई पार पाडली. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सुरू झालेली मोहीम जवळपास दीड तास सुरू होती. यामध्ये जेसीबीच्या मदतीने शेड पाडण्यात आले. कारवाईदरम्यान दोन डंपर, एक जेसीबी आणि दहा कर्मचाऱ्यांची फौज तैनात होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली.
पालिकेच्या माहितीनुसार, हद्दवाढ भागात मोकळ्या जागांवर अतिक्रमणांचे प्रमाण वाढत असून ती हटवून नियोजित विकासकामांना गती देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शहरातील इतर अतिक्रमणांची नोंदही पालिकेने घेतली असून लवकरच आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे. नियमभंग सहन केला जाणार नसल्याचा इशारा प्रशासनाने दिल्याने अतिक्रमणधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.