सातारा : बस स्टँडवर बसमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व इतर सोने चोरी करणारी राज्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी पकडून गुन्ह्यातील ६ महत्वाच्या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाईल असा एकूण १८ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सुरज सुरेश तिगंडे(वय ३३, रा. वांद्रापाडा, सुभाषवाडी, अंबरनाथ वेस्ट), हरिष शिवाजी जाधव (वय ३४, रा. वांद्रापाडा, सुभाषवाडी, अंबरनाथ वेस्ट) अमित चंदन गागडे (वय ३७, रा. कैलासनगर, फडके रोड अंबरनाथ वेस्ट), अभिषेक चंदन गागडे (वय २४, रा.फातिमा चर्चच्या मागे, अंबरनाथ वेस्ट), सुमित कैलास गागडे (वय२५, रा. पंचशीलनगर हौसिंग सोसायटी, सुभाष टेकडी, उल्हासनगर) आणि एका ३२ वर्षीय महिला अशी अटक केलेल्याची नावे असून त्यांचे इतर दोन सहकारी फरार झाले आहेत.
दि २० सप्टेंबर रोजी फिर्यादी अंजलीदेवी अजित मोहिते या पुणे ते महाबळेश्वर या बसने शिरवळ बसस्टॉप येथून केंजळ, ता. वाईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी नसल्याचे लक्षात आले. याची तक्रार त्यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी सिसिटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींची गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा निष्पन्न केली.
दि. १३ नोव्हेंबर रोजी एलसीबीचे पथक हायवेवर पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत निष्पन्न झालेली सिल्वर रंगाची इनोव्हा (एमएच०४ डीजे ०५४५) ही वाई तालुक्यातील बदेवाडी गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर सर्विसरोडवर उभी असल्याची माहिती मिळाली.
गाडीची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी गाडी आणि गाडीतील संशयितांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी शिरवळ, खंडाळा, सातारा, वाई येथील बसस्टँडवर चोरी केले असल्याचे कबूल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संशयित आरोपींवर सातारा जिल्ह्यासह कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, माहीम पोलीस स्टेशन, कुर्ला रेल्वे पोलीस, अंबड पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्यामध्ये एकूण दहा जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कारवाईत भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनी पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे स्थानिक गुन्हे शाखा सातारा, तसेच भुईंज पोलीस ठाण्याचे नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर, अमोल माने, राकेश खांडके, स्वप्नील दौंड, सचिन ससाणे,रविराज वर्णेकर यांचा सहभाग होता. त्यांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक अधिकारी सुनील साळुंखे यांनी अभिनंदन केले आहे.