अक्षदा, वैष्‍णवीला ‘शिवछत्रपती’ पुरस्‍कार जाहीर

by Team Satara Today | published on : 18 April 2025


फलटण : राज्‍यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार पुण्‍याच्‍या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. त्‍यामध्‍ये जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू वैष्णवी विठ्ठल फाळके आसू (ता. फलटण) आणि अक्षदा आबासाहेब ढेकळे (वाखरी, ता. फलटण) यांचाही समावेश असून, फलटणच्या या दोन कन्यांनी सातारा जिल्ह्याची मान उंचावली आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

वैष्णवी फाळके आणि अक्षदा ढेकळे या शेतकरी कुटुंबातील मुलींनी मोठ्या मेहनतीने अल्पावधीत आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये नावलौकिक मिळवत, भारतीय महिला हॉकी संघाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अक्षदा ढेकळे हिला २०२२-२३ साठी, तर वैष्णवी फाळके हिला २०२३-२४ साठीचा मानाचा शिवछत्रपती राज्य पुरस्कार जाहीर झाला. या दोन्ही खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. तीन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘मिड फिल्‍डर’ वैष्‍णवी...

वैष्णवी फाळके हिची २०१९ मध्‍ये भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघात निवड झाली. पुढे २०२१ मध्‍ये भारतीय वरिष्‍ठ महिला हॉकी संघात निवड झाली. चौदाव्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी तिने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले. एशियन गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघाने ब्रांझ पदक मिळवले. त्‍यात महाराष्ट्रातून फलटणच्या या एकमेव खेळाडूची निवड झाली होती. यामध्‍ये तिने मिड फिल्डर म्हणून मोठा दबदबा निर्माण केला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बोरणे घाटात डंपर दरीत कोसळला
पुढील बातमी
"महाआतंक" या कवितासंग्रहाचे प्रकाशन व कविसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न !

संबंधित बातम्या