सातारा : ईपीएस पेन्शनधारकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. वाढती महागाई, अपुरी पेन्शन आणि वैद्यकीय खर्च यामुळे ज्येष्ठ पेन्शनधारकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. आंदोलनादरम्यान पेन्शनधारकांनी किमान ९,००० रुपये दरमहा पेन्शन तसेच त्यावर महागाई भत्ता देण्याची मागणी केली.
ईपीएस पेन्शन धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करीत आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी जोरदार घोषणाबाजी केली .सर्व पात्र निवृत्तांना पूर्ण वेतनावर पेन्शन द्यावी व प्रक्रियेत अडथळे निर्माण करू नयेत, अशीही भूमिका मांडण्यात आली. व्याज मागण्याची पद्धत रद्द करून पात्र व्यक्तीने भरायची रक्कम आणि मिळणारा फरक याचा वजावाटा करावा, अशी सूचना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय पेन्शनधारक व त्यांच्या जोडीदाराला संपूर्ण मोफत वैद्यकीय सुविधा द्याव्यात, स्वस्त धान्य दुकानांतून वाजवी दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, तसेच खाजगी व सरकारी प्रवास साधनांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. पेन्शनधारक व त्यांच्या जोडीदाराच्या अंत्यविधीसाठी ५,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही मागणी करण्यात आली.
तसेच ३-६०९ या ठरावाद्वारे २०१४ साली करण्यात आलेले सर्व बदल रद्द करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.