भोंदूगिरीविरोधात कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर जनवादी महिला संघटनेचे तीव्र आंदोलन; अशोक खरात याच्यावर तात्काळ कारवाईची मागणी

by Team Satara Today | published on : 07 April 2026


सातारा  : भोंदूगिरीला आळा घालावा, भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर तात्काळ कारवाई करावी तसेच त्याला शरण जाणाऱ्या ३९ आमदारांचे राजीनामे घ्यावेत, या मागण्यांसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी १२ वाजता कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

राज्यभर तालुका व जिल्हा पातळीवर आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथेही मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी “भोंदू बाबावर कारवाई करा”, “भोंदूगिरी नाही चालणार”, “अंधश्रद्धेस बळी पडणाऱ्या ३९ आमदारांचे राजीनामे घ्या”, “पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा विरोधी कक्ष स्थापन करा”, “महिला अत्याचार थांबलेच पाहिजेत” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी पक्षाच्या सेक्रेटरी कॉम्रेड आनंदी अवघडे यांनी आपल्या भाषणात अंधश्रद्धा ही समाजासाठी घातक असल्याचे सांगत, महिलांचे लैंगिक व आर्थिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबांवर कठोर कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे ठाम मत व्यक्त केले.


आंदोलनानंतर शिष्टमंडळाने निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात आनंदी अवघडे, रेखा कांबळे, विजया केंजळे, अमर राजे, सचिन शेळके आणि दीपक काळे यांचा समावेश होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील महागाव येथे मातोश्री वृद्धाश्रमाला विश्वरूपिणी ग्रुपचा मदतीचा हात
पुढील बातमी
सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन हब बनविण्यासाठी कोयना- दौलत डोंगरी महोत्सवासारखे महोत्सव ही काळाची गरज - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या