सातारा : गेल्या वीस वर्षांपासून बंद असलेल्या सिटी बस सेवेवरून नागरिकांनी आता तरी आत्मपरीक्षण करून आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारायला हवा, असा थेट सवाल नागरिक दीपक पवार यांनी केला आहे.
शहरामध्ये सिटी बस सेवा पूर्ववत व्हावी यासाठी सामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध वृत्तपत्र समूहांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबवून पाठपुरावा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दीपक पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर बोट ठेवले. नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आणि शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे आमदार व खासदारांचे कर्तव्य असताना, गेल्या वीस वर्षांत या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी का दुर्लक्ष केले, असा सवाल त्यांनी केला.
सार्वजनिक बस सेवा बंद असल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः राज्य शासनाने महिला प्रवाशांना दिलेली ५० टक्के तिकीट सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांचा लाभ सिटी बसअभावी सातारकरांना मिळत नाही. या नुकसानीची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न विचारताना त्यांनी हा आक्षेप कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर केवळ जागरूक नागरिक म्हणून घेत असल्याचे स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींवर सातत्याने विश्वास दाखवणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या निष्क्रियतेबाबत प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवले पाहिजे. हक्काच्या सुविधांपासून वंचित राहूनही गप्प बसणे हे प्रेम नसून अनाठायी भीती आहे. केवळ तोंडी चर्चा न करता नागरिकांनी प्रत्यक्ष कृतीतून एकत्र येऊन सिटी बससह इतर मूलभूत सुविधांसाठी आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.