सातारा : जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच रविवारी रात्रीपासून थंडीचा जोर पुन्हा वाढत हुडहुडी भरू लागल्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढल्यामुळे ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सातारा जिल्ह्यात अचानक थंडीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली. त्यानंतर वातावरणातील बदलामुळे पुन्हा तापमानात वाढ झाली. मागील दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात थंडीमुळे हुडहुडी वाढु लागली असून विशेषतः ग्रामीण भागात या थंडीचा जोर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. रात्री दहानंतर अचानक थंडी जोर धरत असल्यामुळे जनजीवन गारठत असून ग्रामीण भागात आता थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पहाटेच्या वेळीही थंडी कायम राहत असल्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या संख्येत कमालीची घट होऊ लागली आहे.
सध्या जिल्हाभरात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात गावाच्या जवळपास कामगारांनी आपल्या झोपड्या टाकल्या असून थंडीमुळे ऊसतोड कामगार चांगलेच हादरून गेले आहेत. पहाटेच्या वेळी उसाच्या पानांवर मोठ्या प्रमाणात दव पडत असल्यामुळे सकाळी ११ वाजल्यानंतर ऊसतोड करावी लागत आहे.