सातारा : दक्षिण कोरियातील ग्वांगझू येथे आयोजित जागतिक तिरंदाजी स्पर्धेतील कंपाउंड प्रकारात भारतीय तिरंदाजांनी सुवर्णपदक पटकावीत इतिहास रचला. त्यात साताऱ्याच्या प्रथमेश फुगे याची कामगिरी संस्मरणीय ठरली.
भारतीय पुरुष संघाचे जागतिक तिरंदाजी स्पर्धेतील कंपाउंड प्रकारातील हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. त्यात भारतीय तिरंदाजांनी फ्रान्सचे आव्हान मोडीत काढताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. या संघात प्रथमेशचा समावेश आहे. तो साताऱ्याच्या दृष्टी आर्चरी ॲकॅडमीचा खेळाडू आहे. गेली आठ वर्षे तो प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्येचे धडे गिरवीत आहे. प्रथमेश हा मूळचा पिंपरी- चिंचवडचा.
दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो ॲकॅडमीत दाखल झाला. प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम अन् शिस्त या गुणांच्या जोरावर त्याच्या कारकिर्दीला नवे वळण लाभले. याआधी आशियाई स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. दुर्दैवाने कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द झाली. मात्र, जिद्दी प्रथमेशने नाउमेद न होता दमदार कामगिरी करत जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविले. त्याचा हा प्रवास प्रत्येक युवा धनुर्धरासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
‘दृष्टी आर्चरी ॲकॅडमी’ने आदिती स्वामी, ओजस देवतळे, मधुरा धामणकर, साहिल जाधव हे आंतरराष्ट्रीय पदक विजेते घडविले आहेत. त्यात आता प्रथमेशची भर पडली आहे. त्यातील आदिती स्वामी, ओजस देवतळे हे केंद्र सरकारच्या अर्जुन अन् राज्य सरकारच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. प्रशिक्षक प्रवीण सावंत, सहकाऱ्यांचे मार्गदर्शन त्यांच्यासाठी मोलाचे ठरले आहे.