दहिवडी : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी नाकारली गेल्यामुळे खटाव-माणचे नेते शेखर गोरे कमालीचे नाराज झाले आहेत. भाजप पक्षाकडून धैर्यशील कदम यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या शेखर गोरे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून आपली तीव्र नाराजी आणि उद्विग्नता जाहीरपणे व्यक्त केली असून, थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक व आक्रमक सवाल केला आहे.
शेखर गोरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'साहेब, मी नक्की कुठे चुकलो? आपल्या सांगण्यावरून गेल्या १३ वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून, तसेच तुम्ही दिलेल्या जाहीर आश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवून मी भाजपच्या विधानसभेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणले. माण-खटाव मतदारसंघातील विविध निवडणुकांमध्ये माझ्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना संधी न देता, केवळ तुमच्या शब्दाखातर भाजपच्या उमेदवारांना ताकदीने निवडून आणण्याचे काम मी केले. या सर्व घडामोडींची साक्षीदार माझी माण-खटावची जनता आहे. आपण शब्द पाळणारे नेते आहात असे मी आजवर ऐकून होतो, परंतु आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे,' अशा अत्यंत उद्विग्न शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
या पहिल्या प्रतिक्रियेनंतर शेखर गोरे यांनी दुपारी दुसरे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'मी शांत आहे पण संत नाही' असा थेट इशारा देत त्यांनी म्हटले आहे की, माझे सोडा पण जर माझ्या कोणत्याही सहकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर शेखर गोरे अजिबात गप्प बसणार नाही. मग ती व्यक्ती कोणीही असली तरी राजकारण बाजूला ठेवून योग्य वेळी हिशेब चुकता केला जाईल, अशा कडक शब्दांत त्यांनी आपल्या विरोधकांना सुनावले आहे.
या निवडणुकीसाठी अनेक नेते इच्छुक होते, मात्र भाजपने स्थानिक पातळीवरील समीकरणांचा विचार करताना गोरे यांना डावलल्याने जिल्ह्यात मोठ्या राजकीय नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. शेखर गोरे यांच्या या जाहीर भूमिकेमुळे आणि संतप्त पवित्र्यामुळे संपूर्ण सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून दिवसभर सोशल मीडियावर केवळ याच विषयाची चर्चा सुरू होती. आता भाजपचे वरिष्ठ नेते शेखर गोरे यांची ही तीव्र नाराजी कशी दूर करणार आणि आगामी काळात या मतदारसंघातील राजकीय समीकरणे काय वळण घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.