सातारा : लाडकी बहीण योजना कशी बारगळेल, ती कशी फसवी आहे, ही योजना चुनावी जुमला आहे, लाच देता का, भीक देता का, विकत घेता का, यांसारखे अनेक आरोप विरोधकांनी केले आहेत. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. बहिणींबद्दल बोलताना विरोधकांना मनाची नाही तर जनाची लाज वाटली पाहिजे. या योजनेमध्ये खोडा घालणार्या सावत्र भावांना वेळ पडल्यास जोडा दाखवा, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
महिलांच्या सन्मानासाठी असणारी लाडकी बहीण योजना ही यापुढेही कायमस्वरूपी राहणार आहे. महायुती सरकारला आशीर्वाद मिळाला तर या रकमेमध्ये तीन हजारापर्यंत वाढ करू, अशी थेट ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातार्यातील महिला-भगिनींना दिली. येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर लाडकी बहीण लाभार्थी सन्मान योजनेचा शानदार सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे, सातार्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर अनेक सावत्र भावांनी न्यायालयात जाऊन त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्या अडचणींवर मात करत महायुती सरकारचे आम्ही तिघेही दिग्गज नेते त्यांना पुरून उरलो आहोत. त्यामुळे या कपटी सावत्र भावांची तुम्ही काळजी करू नका. मात्र योग्य वेळ आल्यावर त्यांना नक्कीच जोडा दाखवा. महिला सन्मानाच्या अशा योजना यापुढे सुरू राहणार आहेत. मात्र त्यासाठी तुम्ही महायुतीला साथ द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत अप्रत्यक्षरीत्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
ते पुढे म्हणाले, सावत्र भावांनी या योजनेला खोडा घालण्यासाठी न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला. ही योजना चुनावी जुमला आहे, असाही या योजनेचा प्रचार झाला. लाच देता का, भिक देता का, विकत घेता का, यांसारखे अनेक आरोप विरोधकांनी केले. मात्र प्रत्यक्षात महिला-भगिनींच्या खात्यात पैसे आल्यानंतर विरोधकांची तोंडे पांढरी फटक पडली आहेत. महाराष्ट्राच्या बहिणींबद्दल बोलताना विरोधकांना लाज वाटायला हवी. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. असल्या संकुचित विचारांना तो थारा देत नाही. योजनेत खोडा कसा घालता येईल, यासाठी अडथळे आणणार्यांना योग्य वेळ आल्यावर जोडा दाखवा, असे आवाहन शिंदे यांनी केले. न्यायालयाने विरोध करणार्यांची याचिका फेटाळली आणि बहिणींच्या बाजूने निकाल दिला. कारण महिला सन्मान हे महायुतीचे पवित्र काम आहे, असे ते म्हणाले.
महायुती सरकारला मतदार राजाने आशीर्वाद दिला तर दीड हजाराचे पावणे दोन हजार, त्यापुढे 2000, नंतर अडीच हजार, त्याही पुढे जाऊन तीन हजार रुपयापर्यंत रक्कम वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. आमचे सरकार आणखी मजबूत झाले तर मदत देताना हात आखडता घेणार नाही. देणार्याची दानत मजबूत आहे, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. विरोधकांसाठी ही रक्कम किरकोळ आहे. मात्र, गरिबीची चटके ज्यांनी सोसले आहेत त्यांना या पैशाची नक्कीच किंमत आहे. माझ्या महिला भगिनीला कोणापुढे हात पसरावा लागणार नाही. पतीसाठी, मुलांसाठी, घरच्या नातेवाईकांसाठी मनासारखा खर्च करण्याची ही योजना मुभा देते. विरोधकांनी महिला भगिनींच्या गरिबीचे चटके सोसले नाहीत त्यामुळे त्यांना काय कळणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
31 जुलै पर्यंत अर्ज आलेल्या बहिणींना मदत दिली जाणार आहे. काही तांत्रिक कारणामुळे पैसे मिळाले तरी योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. त्यामुळे सप्टेंबर मध्ये अर्ज भरले तरी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे दिले जातील. दरमहा दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या योजनेवरून लाडक्या भावांचे काय, असा सवाल विरोधकांनी केला. कधी कधी लाडक्या भावांच्या मनात काय होते, का भाऊ सोडून गेले, सहकारी सोडून गेले? आमचे सरकार फेसबुक वर बसून घरून काम करणारे सरकार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला दिला.
राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे विरोधक बिथरले आहेत. विरोधकांकडून होणारी बदनामी लांच्छनास्पद आहे. हे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. ज्यांना घेण्याची सवय आहे ते देण्याबाबत काय बोलणार? आम्ही विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तरे देतो, असाही स्पष्ट टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, प्रत्येकाच्या खात्यात पैसे दिल्याशिवाय ही योजना बंद होणार नाही. या योजनेद्वारे थेट बँकेतील खात्यात रक्कम दिली जात आहे. त्यामुळे सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागलेले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये 35000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. माता-भगिनींनी आशीर्वाद दिला तर पुढील पाच वर्षे योजनेचे पैसे देत राहू. पूर्वी सरकारी योजना आणली की दलालांची योजना व्हायची. तुमच्यासाठी ठेवलेले पैसे हे दहा-पंधरा टक्के मिळायचे. पण मोदी सरकारच्या योजनांमुळे आधार मोबाईल क्रमांक बँकेशी जोडणी केल्यामुळे रक्कम थेट खात्यात जमा होत आहे. त्यामुळे कोणीही मध्ये कमिशन खाऊ शकत नाही. आम्ही योग्य उपाययोजनांद्वारे दलालांचा धंदा बंद केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती कार्यक्रमामुळे लाखो करोडो बहिणी महायुती सरकारशी जोडल्या गेलेल्या आहेत. विरोधकांनी योजनेचे खोटे अर्ज भरण्यापासून वेबसाईट बंद पाडण्यापर्यंत अडथळे आणले. ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही. राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी यासाठी केंद्रात आणि राज्याचा प्रयत्न सुरू आहे. आता जर तुम्ही चूक केली तर ते पुन्हा ही योजना बंद पाडतील. ही योजना आम्ही कधीही बंद पडू देणार नाही. त्याकरता तुमच्या मदतीची गरज आहे. महायुतीच्या सरकारला मनापासून साथ द्या, असे आवाहन देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सातारा जिल्हा भाजपच्या वतीने सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. लाडकी बहीण योजनेच्या प्रगतीची साधन आढावा माहिती त्यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित सन्मान सोहळ्यामध्ये सातारा जिल्ह्यातून सुमारे साडेसात ते आठ हजार महिला-भगिनी उपस्थित झाल्या होत्या. यातील प्रतिनिधिक स्वरूपात लाभार्थी 25 महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास खासदार उदयनराजे भोसले काही तांत्रिक कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीची सातार्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.
खोडा घालणार्या सावत्र भावांना जोडा दाखवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सातार्यात विरोधकांचा समाचार
by Team Satara Today | published on : 18 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा