सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले मनोमिलन अभेद्य ठेवल्याने 'खुशीत गाजरे' खाणाऱ्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी इच्छुक असणाऱ्या समर्थकांवर आता राजकीय 'सलाईनवर' जाण्याची वेळ आली आहे. काल शुक्रवारी उरमोडीच्या फार्महाऊसवर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या चर्चेत क्लिष्ट आल्यामुळे दोन्हीही राजांच्या काही समर्थकांचा ‘बीपी’ आणि शुगरही वाढल्याची चर्चा शनिवारी भल्या पहाटे साताऱ्यात झडू लागल्या. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या धक्कातंत्राने थोरल्या महाराजांचा गट बुचळ्यात पडला आहे.
सातारा शहर हे मराठ्यांची राजधानी समजली जाते त्यामुळे येथील राजकीय घडामोडींवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते. अनेक वर्षानंतर सातारा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक ही राजे विरुद्ध राजे गट का? भाजपच्या चिन्हावर लढवली जाते याकडे संपूर्ण साताऱ्याचे लक्ष असताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही निवडणूक मनोमिलनातूनच लढवली जाईल, असे स्पष्ट संकेत दिल्यामुळे साताऱ्यात आता राजकीय संघर्ष होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नगराध्यक्षपदासाठी दोन्ही राजांमध्ये खल झाले. दोघांच्याही पसंतीचा नगराध्यक्ष करायचा असा निर्णयही झाला. पूर्वीप्रमाणेच नगराध्यक्षपद उदयनराजे गटाकडेच राहील, असे गृहीत धरून या पदाच्या उमेदवारीसाठी सोमनाथ उर्फ काका धुमाळ, संग्राम बर्गे, किशोर शिंदे यांची नावे चर्चेत आली असतानाच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण यांचीही नावे चर्चेत आली. चर्चा तर होणारच...! असे गृहीत धरले जात असताना राजघराण्यातील वृषालीराजे, कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापक, अध्यक्ष सौ. वेदांतिकाराजे भोसले, भाजप नेत्या सुवर्णा पाटील यांचीही नावे अचानकपणे चर्चेत आली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत साताऱ्याच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा होणार, असेही सांगितले जाऊ लागले असतानाच उरमोडीच्या एका फार्म हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही राजांनी आपलाच समर्थक नगराध्यक्ष व्हावा, असा राजहट्ट धरल्यामुळे साताऱ्याचा नगराध्यक्ष कोणाच्या गटाचा हा एक नवीन प्रश्न आणि पेच निर्माण झाला आहे.
तुमच्याकडे पाच वर्षे नगराध्यक्षपद होते. आता माझ्याकडे नगराध्यक्षपद दिले तर मलाही कामकाजाला सोपे जाईल. होणारा नगराध्यक्ष आपलाच असेल अशी भूमिका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे मंत्रीपद तुमच्याकडे असल्यामुळे नगराध्यक्ष पद आमच्याकडे असू द्या, आपल्या दोघांच्या विचाराचा नगराध्यक्ष करू अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी घेतल्याचे समजते. नगराध्यक्षपदाचा चेंडू पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणारे उमेदवार काल सायंकाळपासून राजकीय सलाईनवर असल्याचे वृत्त आहे. इच्छुक नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना 'मी नगराध्यक्ष होणार' तर नगरसेवकांना 'आता मी मेहरबान होणार' अशी स्वप्ने पडू लागली असतानाच उरमोडीच्या फार्महाऊसमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे नगरसेवकपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनाही काल रात्रीपासून बीपी आणि शुगरचा त्रास सुरू झाला, असल्याचा गमतीदार चर्चा शनिवारी सकाळी साताऱ्यात सुरू होत्या.
ऐन थंडीत फुटतोय घाम...
गेल्या चार दिवसात सातारा जिल्ह्यात थंडीने काहूर माजवले आहे. त्यातच जिल्ह्यात तब्बल ९ पालिकांसह एका नगरपंचायतीची निवडणूक होत असल्यामुळे जिथे निवडणुका नाहीत अशा ग्रामीण भागातही शेकोटी भोवती राजकीय गप्पांचा फड रंगत आहे. संपूर्ण जिल्ह्यात सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही निवडणूक मनोमिलनाच्या माध्यमातून लढवली जाणार असली तरी दोन्ही गटांकडून रोज नवीन दावे- प्रतिदावे होत असल्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आता ऐन थंडीत घाम फुटायला लागला आहे.
जिल्हा बँकेच्या खलित्याची आठवण
जिल्ह्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून असायचे. या बँकेची निवडणूक राजकारण विरहित लढली जात असली तरी अध्यक्ष कोण याबाबतचा निर्णय पुणे येथील बारामती हॉस्टेलमधुन होत असे. अध्यक्षपदाच्या नावाचा खलिता पुण्यातून येत असे. आता साताऱ्याच्या नगराध्यक्षपदाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकण्यात आल्यामुळे नगराध्यक्षपदाचा खलिता' यावर्षी प्रथमच मुंबई येणार येणार आहे.