कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षण समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती’ योजनेच्या रकमेत लक्षणीय वाढ करून ही शिष्यवृत्ती आता २४०० रुपयांवरून थेट ५,००० रुपये करण्यात आली आहे. शासनाच्या शिष्यवृत्तीच्या बरोबरीची स्वतंत्र शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर ही एकमेव महानगरपालिका ठरली आहे. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सक्षमपणे तयार करण्याच्या उद्देशाने महापालिका दोन सराव चाचण्या व एक अंतिम सराव परीक्षा घेते. यातील गुणवत्ता यादीत पहिल्या २५ क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षांसाठी ही ‘शाहू शिष्यवृत्ती’ प्रदान केली जाते.
महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार तसेच सहायक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवले जात आहेत. तत्कालीन उपायुक्त साधना पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, परीक्षा विभाग प्रमुख संजय शिंदे यांच्यासह सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
‘इस्रो’दौऱ्याचा खर्च कोल्हापूर महानगरपालिका स्वतः उचलत आहे
विशेष बाब म्हणजे, राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून ‘इस्रो’ या जागतिक दर्जाच्या संस्थेचा शैक्षणिक अभ्यास दौरा विमान प्रवासाद्वारे घडवून आणला जात आहे आणि या संपूर्ण दौऱ्याचा खर्च कोल्हापूर महानगरपालिका स्वतः उचलत आहे.
शिक्षणाचा एक आदर्श व अनुकरणीय पॅटर्न उभा केला
फक्त पाचवीच नव्हे, तर इयत्ता पहिली व दुसरीसाठी ‘कोल्हापूर टॅलेंट सर्च’ तिसरी व सहावीकरिता प्रज्ञाशोध परीक्षा, तसेच चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करून महापालिकेने शिक्षणाचा एक आदर्श व अनुकरणीय पॅटर्न उभा केला आहे.