खरीपात कृषी विभागाच्या कामांचा धडाका; सोळा हजार मोहिमा

by Team Satara Today | published on : 16 July 2025


कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे यासाठी अनेक योजना उपक्रम राबविण्यात येतात. त्यातून वेळोवेळी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना याचा लाभ होतो. माहे एप्रिल २०२५ पासून जिल्ह्यामध्ये क्षेत्रीयस्तरावर व्यापक प्रमाणात व मोहीम स्वरूपात कार्यक्रम घेतले जात आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी विविध विषयांच्या एकूण सोळा हजार मोहीमा  घेण्यात आल्या आहेत.  

खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी ग्रामस्तरावर तसेच तालुकास्तरावर खरीप हंगामपूर्व सभांचे आयोजन करण्यात आले. याद्वारे खरीप हंगामामध्ये करावयाच्या शेतीचे नियोजन व कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मोहीम स्वरूपातील कार्यक्रमांची सविस्तर रूपरेषा याबाबत प्राथमिक माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये कृषी विषयक मोहीमा सुरू करण्यात आल्या, आतापर्यंत विविध विषयांचे एकूण सोळा हजार मोहीम घेण्यात आल्या आहेत. 

या मोहिमेमध्ये बीज प्रक्रिया मोहीम, घरचे सोयाबीन उगवण क्षमता चाचणी, हुमणी कीड व्यवस्थापन, बीबीएफ मूलस्थानी जलसंधारण पट्टापेर पद्धत, माती परीक्षण मोहीम, जमीन सुपीकता निर्देशांक आधारित खताचा वापर, जमीन आरोग्य पत्रिका वाटप, व्हाट्सअप ग्रुप, खरीप हंगाम तयारीची ग्रामपंचायतस्तरावर सभा व प्रमुख खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी गाव निहाय प्रशिक्षण, कृषी निविष्ठा यांच्या वाजवी वापरा बाबत जनजागृती मोहीम, सेंद्रीय निविष्ठा निर्मिती व वापर, कृषी विषयक माहिती तंत्रज्ञानाची साधने बाबत माहिती देणे, कृषी आधारित व्यवसाय युनिट उभारणी, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन मोहीम, खरीप पिकांच्या रोपवाटिका, ऊस सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान, भात शेती यांत्रिकीकरण मोहीम भात पिकामध्ये युरिया ब्रिकेटचा उपलब्धता व वापर वाढवणे, पाणी फाउंडेशन डिजिटल शेतीशाळा, विकसित कृषी संकल्प अभियान इत्यादी मोहिमांच्या माध्यमातून कृषी विभाग शेतक-यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे.

बीज प्रक्रिया 2 हजार 828 मोहिमा, घरचे सोयाबीन उगवण क्षमता चाचणी 2 हजार 67, हुमणी किड व्यवस्थापन 1 हजार 123, बीबीएफ मूलस्थानी जलसंधारण पट्टापेर पद्ध 520, माती परीक्षण मोहिम, जमीन सुपीकता निर्देशांक आधारित खताचा वापर, जमीन आरोग्य पत्रिका वाटप 1 हजार 850, व्हाट्असप ग्रुप 930, खरीप हंगाम तयारीची ग्रामपंचायतस्तरावर सभा व प्रमुख खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी गाव निहाय प्रशिक्षण 1 हजार 724, कृषी निविष्ठा यांच्या वाजवी वापरा बाबत जनजागृती मोहिम 1 हजार 259, सेंद्रीय निविष्ठा निर्मिती व वापर 895, कृषी विषयक माहिती तंत्रज्ञानाची साधनेबाबत माहिती देणे 970, कृषी आधारित व्यवसाय युनिट उभारणी 326, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन मोहिम 748, खरीप पिकांच्या रोपवाटिका,ऊस सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान 353, भात शेती यांत्रिकरण मोहिम भात पिकामध्ये युरिया ब्रिकेटचा उपलब्धता व वापर वाढवणे 187, पाणी फाउंडेशन डिजिटल शेतीशाळा 52 व विकसति कृषी संकल्प अभियान 235 अशा प्रकारे एकूण 16 हजार 67 मोहिमा राबविण्यात आल्या.

खरीप हंगामामध्ये या मोहिमेच्या माध्यमातून क्षेत्रीयस्तरावर शास्त्रीय पद्धतीने माती परीक्षणाचे नमुने गोळा करण्याची पद्धत याबाबत प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. माती परीक्षणाचे शेतीतील महत्त्व व माती परीक्षण अहवालाच्या आधारे संतुलित खतांचा वापर करणे याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी व पीक वाढीच्या प्राथमिक टप्प्यात कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकांचे तसेच ज्या पिकांचे घरगुती बियाणे शेतकरी वापरतात त्या पिकांचे बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत खात्री करणे आवश्यक आहे, यासाठी सोयाबीन बरोबरच इतर पिकांच्याही बियाण्यांची उगवणक्षमता तपासण्याच्या पध्दतीबाबत प्रचार, प्रसार करण्यात येत आहे.

खरीप हंगामात मुख्य पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाबाबत प्रात्यक्षिक आधारित शेतीशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत. कृषी यांत्रिकीकरण प्रचार व प्रसार, महाडीबीटी प्रणालीवर अर्ज वाढविणे व कृषी विभाग, कृषी सेवा केंद्र, कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी निविष्ठांच्या वाजवी वापराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळातच काही ठिकाणी जास्त तीव्रतेच्या रसायनांचा वापर केला जातो यामुळे पीक परिसंस्थेवर व मानवी आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात, हे टाळण्यासाठी पीक संरक्षक निविष्ठांचा संतुलित वापर करण्याबाबत प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. सेंद्रीय निविष्ठा तयार करणे व त्याच्या वापराबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. कृषी निविष्ठा वापरताना घ्यावयाची काळजी व वापरलेल्या निविष्ठांची वेष्टने, रिकामे डबे यांची योग्य विल्हेवाट लावणे, कीटकनाशके व रासायनिक औषधांच्या लेबल क्लेम विषयी जनजागृती केली जात आहे.

खरीप हंगामातील विविध पिकांच्या कीड व रोग व्यवस्थापणाबाबत शेतक-यांना माहिती दिली जात आहे सर्वसाधारणपणे उसाच्या क्षेत्रात हुमणी किड आढळून येते. हुमणी कीड व्यवस्थापनाकरिता एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. प्राधान्याने ऊस क्षेत्राच्या पट्टयात याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे अशा भागामध्ये तसेच इतरही क्षेत्रात हुमणी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्यास त्याठिकाणीसुद्धा हुमणी किड नियंत्रणाबाबत प्रचार, प्रसार व प्रकाश सापळे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहेत. ऊस सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान पद्धतीनुसार रोपवाटिकेमध्ये उसाचे एक डोळे बेणे लाऊन वाढविल्यास सरासरी पाण्याची बचत होते. या नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी क्षेत्रीयस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे.  

कृषी विषयक तांत्रिक माहिती, कृषी विभागाच्या विविध योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत समाज माध्यमाद्वारेही पोहोचण्यासाठी जिल्ह्याच्या कृषी विभाग या नावाचे व्हाटसअॅप चॅनल तयार करण्यात आलेला आहे. याद्वारे   शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचविण्यात येते. तसेच गावोगावी क्यू आर कोडही लावण्यात आलेले आहेत या क्यूआर कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती मोबाईलवर उपलब्ध होत आहे.

कृषी विषयक विविध योजना, उपक्रम व कृषी तंत्रज्ञान जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. तसेच सदरच्या मोहिमा यापुढील कालावधीत देखील सुरू राहणार असून शेतकऱ्यांचे पिक  उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभाग कार्यरत राहणार आहे. कृषी विभागाच्या सोळा हजार मोहिमेतून नक्की शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्नात वाढ होईल यात शंका नाही.

वर्षा पाटोळे - जिल्हा माहिती अधिकारी, सातारा


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माऊलींचा परतीचा प्रवास सुरू
पुढील बातमी
तेलंगणा सीमाभागातील 14 गावे महाराष्ट्रात होणार सामील

संबंधित बातम्या