बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याला आज व्हीसीद्वारे बीड कोर्टासमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने या प्रकरणात कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वीच खंडणीच्या गुन्ह्यातही कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता मोक्का मध्येही त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पवनचक्की खंडणी प्रकरणातील गुन्ह्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग आढळल्याने वाल्मीक कराडवर हत्येसह मोक्काचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टासमोर हजर केलं असता कराड याला सुरुवातीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं. प्राथमिक तपास पूर्ण झाला असल्याने पोलीस यंत्रणेकडून कराडच्या कोठडीची मागणी न करण्यात आल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या झाली होती. यात सुदर्शन घुले, विष्णू चाटेसह आठ जण अगोदर आरोपी होते. त्या सर्वांवर मोक्का लावला होता. परंतु, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याचादेखील यात सहभाग असल्याचा आरोप करत देशमुख कुटुंबाने आंदोलन केले होते. त्यानंतर कट रचल्याचा ठपका ठेवत कराडवरदेखील मोक्का लावण्यात आला. एकूण नऊ आरोपींवर मोक्का लागला असून, कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मोक्का लावताना सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा प्रमुख केले आहे. कराड हा सदस्य आहे.
सीआयडीने कराड, चाटे, घुले यांच्यासह इतर आरोपींचे कॉल डिटेल्स काढले आहेत. यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी कराड आणि चाटे यांच्यात कॉल झाले आहेत. तसेच चाटे आणि घुले यांच्यातही संवाद झाला. हाच धागा पकडून कराडला मोक्का मध्ये घेतल्याची माहिती आहे.