सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघात सामान्य नागरिकांच्या कामाची जागेवर सोडवणूक व्हावी याकरिता प्रायोगिक तत्त्वावर पालकमंत्री आपल्या दारी ही योजना राबविण्यात आली होती .गेल्या चार महिन्यांमध्ये या योजनेच्या माध्यमातून 2127 लोकांच्या विविध तक्रारींचा जागेवर निपटारा करण्यात आलेला आहे .या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे संपूर्ण सातारा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ निहाय लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन ही योजना राबवण्यात येणार आहे .अशी माहिती सातारा जिल्ह्याची पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, राज्य सरकारच्या काही महत्त्वपूर्ण महत्त्वकांक्षी योजनेपैकी साताऱ्यात ही योजना पहिल्यांदाच राबवण्यात आली .या योजने करता स्वतंत्र एजन्सी नेमून त्यामध्ये एक संचालक आणि चार सहाय्यक यांना लॅपटॉप आणि आधुनिक असे मोबाईल संच देण्यात आले आहेत. पाटण तालुक्यातील रोज प्रत्येकी दोन ते तीन गावांमध्ये या पथकाने जाऊन नागरिकांच्या पाणीपुरवठा, रस्ते महसूल तसेच पायाभूत सुविधांचे प्रश्न यांचा आढावा घेऊन त्याचा पंचायत समिती ग्रामपंचायत तसेच संबंधित कार्यक्षेत्रातील प्रांत कार्यालयाकडे पाठपुरावा करून त्या समस्या सोडविल्या आहेत .नागरिकांचा संबंधित शासकीय कार्यालयाकडे जाण्याचा वेळ आणि पैसा वाचलेला आहे.
या योजनेच्या प्रसिद्धीसाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर याबाबतची बैठक घेऊन या योजनेचा जिल्हा व्यापी आराखडा कसा राबवायचा तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय या योजनेची अंमलबजावणी कशी करावयाची याबाबत महायुतीच्या सर्व आमदारांशी चर्चा करून ही योजना लवकरच लागू केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.