सातारा : मातृत्व वंदना योजनेचा वेळेत मोबादला मिळावा, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले मानधन वेळेत मिळावे, सेवानिवृत्त लाभाचे कागदपत्रे पूर्ण करुन घेवून त्यांना लाभ त्वरीत देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर आंदोलन करण्यात आले. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रतिभा भोसले, अनिता चव्हाण, मालन गुरव, संगीता भुजबळ, संगीता झेंडे आदी सहभागी झालेल्या होत्या.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळा वाढत आहे. सध्या ४0 डिग्रीचे तापमान आहे. त्यामुळे अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते १२ अशी करण्यात यावी, मातृत्व वंदना योजनेचे मानधन वेळेत मिळावे, लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरण्यामध्ये प्रशासनाला सहकार्य केले होते. त्याचे मानधन वेळेत मिळावे, पोषण ट्रॅकर ॲप ओपन होत नाही. ओपन होण्यास वेळ लागतो. रेंज नसते. फोटो अपलोड होत नाहीत. ॲपमध्ये सुधारणा करण्यात यावी, सेवानिवृत्ती लाभाचे कागदपत्रे पूर्ण करुन त्यांना त्वरीत लाभ देण्यात यावा, रिक्त जागेवर त्वरीत भरती करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.