नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. स्मृती मानधनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक महत्त्वाची घोषणा करत, पलाश मुच्छलसोबतचा तिचा विवाह सोहळा रद्द झाल्याचे जाहीर केले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून स्मृती आणि पलाशच्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा होती. लग्नापूर्वी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हा विवाह पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात होते. या चर्चांवर मौन तोडत स्मृतीने अखेर आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या पोस्टमध्ये स्मृतीने म्हटले आहे की, "गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अटकळी बांधल्या जात आहेत. मला आता यावर बोलणे महत्त्वाचे वाटते. मी अत्यंत खासगी आयुष्य जगणारी व्यक्ती आहे आणि मला ते तसेच ठेवायला आवडेल. मात्र, मला हे स्पष्ट करायचे आहे की, माझा विवाह रद्द झाला आहे. स्मृतीने पुढे विनंती केली आहे की, "मला हे प्रकरण इथेच संपवायचे आहे आणि मी सर्वांनाही तेच करण्याची विनंती करते. कृपया या कठीण काळात दोन्ही कुटुंबांच्या खासगीपणाचा आदर करावा, आम्हाला सावरण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा."
पलाशनेही शेअर केली प्रतिक्रिया
पलाश यानेही इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की, "मी माझ्या खोट्या गोष्टी सोडून पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी सर्वात पवित्र असलेल्या गोष्टीबद्दलच्या निराधार अफवांवर लोक इतक्या सहजपणे प्रतिक्रिया देतात हे पाहणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा आहे आणि मी त्याचा सामना करेन.