उंब्रज पोलिसांकडून केवळ 2 तासात टायर चोरटे जेरबंद

by Team Satara Today | published on : 05 March 2025


उंब्रज : उंब्रज पोलिसांनी गुन्हा घडल्याच्या केवळ 2 तासात टायर चोरटे जेरबंद करुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव दीपक सुतार रा. उंब्रज, ता. कराड हे मौजे कळंत्रेवाडी येथील सिद्धिविनायक ट्रान्सपोर्ट च्या गोडाऊन मध्ये कामाला आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआरएफ कंपनीचे भारत बेंज ट्रकचे रिमोल्ड केलेले असा एकूण 60 हजार रुपये किंमतीचे 4 टायर चोरट्यांनी गोडाऊनच्या शटरचे छन्नी व हातोड्याच्या साह्याने कुलूप तोडून चोरून नेले होते. ही बाब लक्षात येताच दि. 3 रोजी फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून सदरची घटना मध्यरात्री झाल्याचे सांगितले. त्यानुसार उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तात्काळ उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी पोलीस अंमलदार व पोलीस स्टेशन मधील अधिकारी यांना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पेट्रोलिंग करत असताना उंब्रज गावच्या हद्दीत रणजीत सोमनाथ चव्हाण वय 22, संकेत संतोष चव्हाण वय 19, अमोल रमेश चव्हाण वय 19 सर्व रा. लक्ष्मी नगर, उंब्रज, ता. कराड येथील रहिवासी असून, ते संशयितरित्या आढळून आले. त्यांच्याजवळ गुन्ह्याची विचारपूस केली असता त्यांनी टायर चोरल्याची कबुली दिली. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना अटक करून गुन्ह्यात चोरलेला सर्व मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले हे करीत आहेत.

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, रमेश ठाणेकर, पोलीस हवालदार संजय धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार कोळी, मयूर थोरात, श्रीधर माने, प्रशांत पवार यांनी सहभाग घेतला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून स्वागत
पुढील बातमी
आनेवाडी टोल नाका परिसरात लक्झरी बसला भीषण आग

संबंधित बातम्या