कवठेत महाराजस्व अभियानांतर्गत शेतरस्ता खुला

by Team Satara Today | published on : 16 August 2025


सातारा :  वाई तालुक्यातील कवठे हे गाव क्रांतिकारी व पुरोगामी विचारसरणीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. गावातील शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तहसीलदार यांना कायदेशीर मोजणीद्वारे रस्ता नकाशावर नोंदवून देण्याचे निवेदन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, वाई प्रांताधिकारी योगेश खरमाटे व तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी यांच्या सहकार्याने डुक्कर जाई शिवारातील महत्त्वाचा शेतरस्ता खुला करून देण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने अलीकडेच पाणंद रस्त्यांचे रुंदीकरण व पक्कीकरणाबाबत नवीन शासनादेश काढला असून, त्यानुसार हे रस्ते किमान बारा फूट रुंद करण्याचा व अडथळे दूर करण्याचा अधिकार तहसीलदार यांना देण्यात आला आहे.

महसूल सप्ताह अंतर्गत नागरिकांची मागणी प्रत्यक्षात उतरली. तहसीलदार श्रीमती मेटकरी यांनी स्वतः शिवारात हजेरी लावून सरकारी मोजणी करून रस्ता निश्चित केला व पुढील काळात तो पक्का करण्याची कार्यवाही सुरू होईल, असे जाहीर केले. या वेळी श्रीमती मेटकरी यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतशील भूमिकेचे कौतुक करत, इतर रस्त्यांसाठीही शासनाचा पूर्ण पाठिंबा राहील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाला सुरूर मंडल अधिकारी कोळेकर,  तलाठी गायकवाड, कोतवाल मोरे बापू आदी उपस्थित होते. गावाच्यावतीने सरपंच सौ. मंदाकिनी पोळ, उपसरपंच श्री. शिवाजीराव डेरे व ग्रामविकास अधिकारी कोचळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या यशस्वी उपक्रमासाठी शेतकरी वर्ग व गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग लक्षणीय ठरला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण येथे ध्वजारोहणानंतर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
पुढील बातमी
कराडातील मतदार यादीही सदोष

संबंधित बातम्या