सातारा : उसने दिलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून एका युवकावर लोखंडी शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २० जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चारभिंत ते राजवाडा या रस्त्यावरून विपुल भानुदास बेबले (रा. कोडोली, सातारा) हा युवक जात होता. यावेळी उसने घेतलेले पैसे न दिल्याच्या रागातून संशयित अमित कांबळे (रा. संगमनगर, सातारा) आणि त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांनी विपुल याला अडवून लोखंडी शस्त्राने जबर मारहाण केली. या घटनेत विपुल जखमी झाला असून, त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमित कांबळे याच्यासह इतर तीन अज्ञात साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नाईक बोराटे या करत आहेत.