सातारा, दि. 13 (प्रतिनिधी) - शिरवळ पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेला व अनेकवेळा सुधारण्याची संधी देवून वर्तनात सुधारणा न झाल्याने शिरवळ येथील सटवाई कॉलनीत वास्तव्यास असलेल्या युट्यूब पत्रकार किरण प्रकाश मोरे (वय 37) याला दोन वर्षांसाठी पुणे व सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी दिला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण मोरे याच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. नुकताच तरुणाच्या अपहरण व मारहाण, खंडणी प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, फलटणचे पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्या निर्देशानुसार किरण मोरे याच्या पुणे व सातारा जिल्ह्यातून हद्दपारीचा प्रस्ताव वाईचे उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्याकडे शिरवळ पोलीस ठाण्याने दिला होता.
या प्रस्तावाची सुनावणी होवून डॉ. खरमाटे यांनी किरण मोरे याला सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याचा आदेश पारीत केला आहे. शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे व सहकार्यांनी प्रस्ताव तयार केला होता. दरम्यान, किरण मोरे व त्याचा साथीदार विशाल महादेव जाधव, इरफान दिलावर शेख यांनी कोणाला धमकावून पैशाची मागणी केली असल्यास निर्भयपणे शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, तक्रारदाराची माहिती व नाव गुप्त ठेवले जाईल, असे पोनि नलवडे यांनी सांगितले.