कराड शहरातील देखावे पाहण्यासाठी खुले

by Team Satara Today | published on : 03 September 2025


कराड : घरगुती गणपती व गौरी विसर्जनानंतर सोमवारपासून कराड शहरातील देखावे पाहण्यासाठी खुले झाले. मंगळवारी शहरातील बहुतेक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी खुले झाले. ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांबरोबर जनजागृतीपर देखाव्यांवर यावर्षी गणेश मंडळांनी विशेष भर दिला आहे. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे. 

कराड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून ऐतिहासिक तसेच जिवंत देखाव्यांचे सादरीकरण करण्यात येत आहे. पारंपरिक शैलीत साकारलेल्या या देखाव्यांमध्ये भुताची गुहा, सर्जिकल स्ट्राईक, शाहिस्ते खानाची फजिती यांसारख्या विषयांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे. याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सामाजिक विषयांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या विचारांना चालना देणारा आशय देखाव्यांतून मांडण्यात येत आहे. 

कमाणी मारुती मंदिराजवळ शाहिस्तेखानाची फजिती हा जिवंत देखावा सादर केला आहे. तर खशबू गणेश मंडळाचा प्रतिवर्षीप्रमाणे हालता देखावा आहे. या मंडळाचे देखावे लक्ष वेधून घेणारे असतात. सोमवार पेठेतील बालाजी चौक गणेश मंडळाने केदारेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. तेथीलच एका मंडळाने ऑपरेशन सिंदूरची प्रतिकृती साकारली आहे. मंगळवार पेठेतील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने भुताची गुहा हा जिवंत देखावा साकारला आहे. या शिवाय जय जवान मंडळानेही भुताची गुहा हा देखावा केला आहे. काही मंडळांचे जिवंत देखावे आहेत. हे देखावे पाहण्यासाठी खुले करण्यात आले असून, शहरातील नागरिकांसह परिसरातील गावांमधूनही मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करू लागले आहेत. विशेषत: महिला व कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. देखावे पाहण्यासाठी खुले झाले असून सांस्कृतिक मेजवानीबरोबर सामाजिक संदेशही देखाव्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जल प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तळ्यात विसर्जन करा: जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
दूध दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

संबंधित बातम्या