पुसेगाव : पुसेगाव येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या सातारा-म्हसवड टेंभुर्णी- लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील श्री सेवागिरी महाराज मंदिराशेजारील येरळा नदीवरील पूल ते बाचल कॉर्नर असे रुंदीकरण व रस्ता काँक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. परिणामी नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आजपासून १२ डिसेंबरपर्यंत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली.
पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सातारा बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहनेही नेर फाटा, नेर, ललगुण, राजापूर, कुळकजाई, मलवडी मार्गे दहिवडीकडे जातील किंवा नेर फाटा, नेर गाव, ललगुण, बुध, छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसेगावमार्गे दहिवडीकडे जातील दहिवडी बाजूकडून सातारा बाजूकडे जाणारी वाहने ही छत्रपती शिवाज महाराज चौक पुसेगाव येथून खातगुण फाटा, खातगुण गाव, जाखणगाव विसापूर मार्गे विसापूर फाट्यावरून सातारकडे जातील किंवा पिंगळी येथून वडूज, चौकीचा आंबा, विसापूर विसापूर फाटा येथून सातारकडे जातील. वडूज बाजूकडून सातार बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खटाव येथून जाखणगाव, विसापूर विसापूर फाट्यामार्गे साताऱ्याकडे जातील. फलटणवरून सातार बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ललगुण येथून नेर, नेर फाट्यामागे साताऱ्याकडे जातील. या वाहतूक मार्गात केलेल्या बदलांसाठी सव नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंव घेऊन पोलिस दलास सहकार्य करावे असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी केले आहे.