सातारा : "महिलांमधील कलागुणांना वाव मिळणे आवश्यक आहे. समाजाने या दृष्टीने विचार करणे गरजेचे असून महिलांच्या प्रगतीमधूनच समाजाची प्रगती साधेल. त्यासाठी कोणत्याही क्षेत्रात असो; भगिनींना त्यांचे कला गुण दर्शवण्यासाठी सर्वांनी प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मदत करावी." असे प्रतिपादन खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी केले.
संस्कृती कला मंच तर्फे आयोजित केलेल्या जिजाऊ सावित्री निबंध कविता लेखन पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संयोजक संस्कृती कला मंचचे अध्यक्ष यशेन्द्र क्षीरसागर, बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षाराणी ओमासे ,गट समन्वयक जमीर शिकलगार ,विस्तार अधिकारी शिवराज मोहिते तसेच सर्व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. श्रीमती ओमासे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षीरसागर यांनी प्रस्तावनेमध्ये या स्पर्धेमागील भूमिका व्यक्त केली. अंगणवाडी सेविका तसेच पंचायत समिती मधील कार्यालयीन भगिनी यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धा घेतल्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या संपूर्ण लेखनाचे हस्तलिखित तयार करण्यात येईल, असे देखील ते म्हणाले.लीना कुंभार, प्रतीक्षा चव्हाण, सुप्रिया राऊत,सायली मांडवे, निकिता गोरवे, विजया भोकरे, शुभांगी सावंत, अमृता कुंभार, सुजाता चन्ने, लैलाबी लानी यांना उत्कृष्ट निबंध लेखनासाठी जिजाऊ सावित्री पुरस्कार प्राप्त झाला.
उत्कृष्ट कविता विजेते सुमय्या शेख ,पूजा मांडवे राधिका नलवडे ,अबोली चोरमले ,वहिदा पटवेकरी,राजश्री कदम ठरले. विशेष पुरस्कार श्रीमती ज्योती देशमुख, श्रीमती राणीताई तडाके यांना पंचायत समितीच्या कर्मचारी भगिनींच्या गटातून प्राप्त झाले.
मंगेश लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता चन्ने यांनी मनोगत व्यक्त केले .श्री.क्षीरसागर यांनी प्रस्तावना केली. गट समन्वयक जमीर शिकलगार यांनी नियोजनामध्ये मोलाची मदत केली. अंगणवाडी पर्यवेक्षिका पूजा गायकवाड यांनी आभार मानले.