समाजभुषण - दलितमित्र स्व. शिवराम माने गुरूजी यांच्या अर्धपुतळ्याचे उद्या अनावरण

by Team Satara Today | published on : 14 March 2025


सातारा : महाराष्ट्र शासनाने व जिल्हा परिषद साताराने विविध पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या, ‘‘श्री जानाई मळाई सोशल ऍण्ड एज्युकेशनल फाउंडेशन, सातारा’’ या संस्थेचे संस्थापक ‘‘समाजभूषण - दलितमित्र स्व. शिवराम लक्ष्मण माने (गुरूजी)’’ यांची उद्या 92 वी जयंती. या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेने, ‘‘संस्था कार्यस्थळावर उभारलेल्या पंचधातूच्या अर्धपुतळ्याचा अनावरण समारंभ, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांच्या शुभहस्ते, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या आणि कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.’’ याप्रसंगी पोलीस वाद्य वृंद पथकामार्फत कलेचे सादरीकरण केले जाणार आहे.

स्वर्गीय माने गुरूजी यांनी आपली संपूर्ण हयात शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी खर्ची घातली. दीन-दलित, उपेक्षित समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. समाजाचा विकास करण्याचे प्र्रयत्न करत असताना समाजातील अशिक्षितपणाचा अडथळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्यानंतर गुरूजींनी, त्यांच्या कुवतीप्रमाणे सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर्व-प्राथमिक, प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा सुरू केल्या. या शैक्षणिक कार्याबरोबरच समाजहिताचे हजारो अनोखे उपक्रम राबवून समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले. गुरूजींच्या कार्याची स्मृती चिरंतर दरवळत रहावी, त्याच्या आदर्शाचा पाठपुरावा केला जावा, त्यांचे विचार अंगीकारले जावेत, त्यांच्या आदर्शांची, विचारांची ओळख भावी पिढीस व्हावी, त्यातून सुसंस्कृत, सुजाण समाजव्यवस्था उभारली जावी, या हेतूने संस्थेने त्यांच्या पंचधातूच्या पुतळ्याची निर्मिती करून हा अर्धपुतळा संस्था कार्यस्थळावर बसविला आहेे. या अर्धपुतळ्याच्या कलाकृतीची निर्मिती शिल्पकार विनायक पवार कोंजवडे, ता. पाटण यांनी केली आहे.

अशा या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी माजी शिक्षण व अर्थसमिती सभापती सुनिल काटकर (तात्या), जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, माजी. जिल्हा परिषद सदस्य संदिप शिंदे, युवा नेते संग्राम बर्गे, शाळा कमिट्यांचे पदाधिकारी, विविध गावांचे ग्रामस्थ, शैक्षणिक-सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, विद्यार्थी, पालक, बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत.

तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रतिभा जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूपुरी मध्ये परप्रांतियांच्या धुडगुसाने नागरिक भयभीत
पुढील बातमी
निमलष्करी माजी सैनिकांना घरपट्टी माफ करावी

संबंधित बातम्या