सातारा : राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण इतिहास घडला. सिंदखेडराजा या त्यांच्या जन्मभूमीतील स्मारकाची अवस्था योग्य नाही. याबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी भारतीय पुरातत्व विभागकडे केली होती. याची दखल घेत अवघ्या काही तासातच पुरातत्त्व विभागाने थेट मुंबईतून यंत्रणा गतिमान करत नगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. त्यामुळे आता राजमाता जिजाऊ स्मारकाला नवी झळाळी मिळणार आहे.
मराठवाड्यातील जालना व बुलढाणा जिल्हा दौर्यावर असलेल्या आ. शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मस्थळाला भेट दिली. यावेळी राजमातांचे वंशज श्रीमंत शिवाजीराजे जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अॅड. रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर, राजेंद्र अंभोरे, नगरसेवक श्याम मैत्री, विजय तायडे, नरू तायडे, बबन मस्के, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष डॉ. बालाजी कळकुंबे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ज्योती जाधव, सिताराम चौधरी, जगन्नाथ सहाने, सतीश काळे उपस्थित होते.
स्मारकाच्या दुरावस्थेबाबत डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आ. शशिकांत शिंदे यांना माहिती दिली. आ. शिंदे यांनी तत्काळ स्मारकाची पाहणी करुन भारतीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी तेजस गर्ग यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून स्मारकाबाबत त्यांना माहिती दिली. पुरातत्व विभागाला मर्यादा असल्याने व स्थानिक नगरपालिका क्षेत्र असल्याने नगरपालिकेच्या माध्यमातून या स्मारकाची देखभाल दुरुस्ती केली जावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. नगरपालिका याबाबत सकारात्मक असल्याचेही निदर्शनास आणून दिल्यानंतर गर्ग यांनी आपल्या विभागातून सर्व माहिती घेत आ. शशिकांत शिंदे यांच्याशी पुन्हा संपर्क साधून स्मारकाच्या दुरावस्थेबाबत वस्तुस्थिती असल्याचे स्पष्ट केले. मात्र वैभव संगोपन योजनेच्या माध्यमातून सिंदखेडराजा नगरपालिकेने तातडीने प्रस्ताव सादर करावा, तो प्रस्ताव तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, छत्रपती शिवरायांचा मावळा या नात्याने आ. शशिकांत शिंदे यांनी माँ साहेबांच्या स्मारकाविषयी लक्ष घातल्याने केवळ अर्ध्या तासात हा विषय मार्गी लागला असल्याचे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अद्वितीय व्यक्तिमत्व घडवणार्या या प्रेरणामूर्ती मातोश्रींना नतमस्तक होऊन वंदन करण्याचे भाग्य लाभले. आजही त्यांचे विचार व कर्तृत्व आत्मविश्वास, प्रेरणा व दिशा देतात. त्यांच्या स्मारकाचे संगोपन करणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य मानतो. त्याप्रमाणे यापुढे आम्ही कार्यरत राहू. पक्षाच्यावतीने लवकरच सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांना निवेदन देवून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, यासाठी चर्चा करणार आहे. तसेच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारला तातडीने या विषयात लक्ष घालण्यास सांगणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हे स्मारक सुस्थितीत राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.