मारुल तर्फे पाटण येथे वणव्याने आंबा, नारळ, सुपारी, बाग उद्ध्वस्त; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

by Team Satara Today | published on : 01 April 2026


पाटण : कोयना विभागातील मारुल तर्फे पाटण येथील प्रभाकर राजाराम सूर्यवंशी यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात व्यक्तीकडून रविवारी लावण्यात आलेल्या वणव्यामुळे आंब्याची बाग पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत सुमारे ६०० हून अधिक आंबा, फणस, सुपारी आणि चिकूची झाडे नष्ट झाली असून, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सूर्यवंशी यांनी तीन वर्षांपूर्वी मोठ्या कष्टाने ही बाग उभारली होती. चैत्र महिन्यात आलेल्या पालवीमुळे बाग हिरवीगार आणि बहरलेली दिसत होती. मात्र एका दिवसात लागलेल्या वणव्यामुळे संपूर्ण बाग राखेत परिवर्तित झाली. या आगीत केवळ झाडेच नव्हे, तर ठिबक सिंचन व्यवस्था, पाईपलाइन यांचाही पूर्णतः नाश झाला आहे. शेतकऱ्याने आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे जपलेल्या या झाडांचे झालेले नुकसान पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक वणवा लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रभाकर सूर्यवंशी यांच्याकडून करण्यात येत आहे. या घटनेची माहिती गावकामगार, तहसीलदार, वनविभाग आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे.

मी कष्टाने ही बाग उभी केली आहे. यात आंबा, फणस, नारळ, चिकू अशी झाडे लावली आहेत. मात्र अज्ञात व्यक्तीने वणवा लावल्याने उभी केली बाग अचानक नाहीशी झाली त्याचा शासनाने तत्काळ पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. - प्रभाकर सूर्यवंशी, आंबा बागायतदार, मारुल तर्फे पाटण


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नव्या वाघाची भर; ‘रायबा’चे आगमन; ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्ट छायाचित्र
पुढील बातमी
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे निलंबित; विभागीय चौकशीचे आदेश

संबंधित बातम्या