सातारा : जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत आणि पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 1 हजार 492 ग्रामपंचायतीत विशेष महिला ग्रामसभा आणि महिला सभा पार पडली. यामध्ये आरोग्यासह अन्य विषयांवरही चर्चा करण्यात आली. तसेच पाणी आणि स्वच्छतेत काम करणार्या महिलांचा सन्मानही करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने महिला ग्रामसभा तर पाणी व स्वच्छता विभागाकडून महिला सभेचे आयोजन करण्यात आले होते. महिला सभेंतर्गत सातारा तालुक्यातील कोंडवे येथे वॉश रन चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने-भोसले, सरपंच आयुब शेख, विस्तार अधिकारी दळवी, जिल्हा तज्ज्ञ रवींद्र सोनावणे, अजय राऊत, राजेश भोसले, गणेश चव्हाण, ऋषिकेश शिलवंत, हेमा बडदे, ग्रामपंचायत अधिकारी लोहार, मुख्याध्यापक शिंगटे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
या दिनाच्या निमित्ताने पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने विविध उपक्रमही घेण्यात आले. तालुकास्तरावर पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी महिलांच्या आरोग्यविषयी मार्गदर्शन केले. तसेच याच कार्यक्रमात पाणी व स्वच्छता कार्यात विशेष कार्य करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. हर घर जल’ घोषित झालेल्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्याकडून प्राप्त अभिनंदन पत्र आणि प्रमाणपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले. त्याचबरोबर गावस्तरावर बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम संघाच्या महिला, युवती व विद्यार्थिनी यांची वॉश रन’ही झाली. या सर्व सभा तसेच कार्यक्रमांना प्रतिसाद मिळाला.