परळी येथील शिवमंदिरांचे जतन, संवर्धन करण्यासाठी ६ कोटी ५४ लाख ; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर

by Team Satara Today | published on : 11 April 2026


सातारा :  परळी, ता. सातारा येथे सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेली प्राचीन केदारेश्वर व महादेव मंदिर, या दोन शिवमंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी  सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून ६ कोटी ५४ लाख ३० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजूर केल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. श्रीमती सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत. 

परळी येथे प्राचीन हेमाडपंथी शैलीतील केदारेश्वर व महादेव मंदिर, ही दोन मंदिरे १३ ते १४ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. या दोन्ही मंदिरात सुंदर कोरीव काम असून मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. सध्यस्थितीत मंदिरांची देखभाल न झाल्याने मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. हा ऐतिहासिक, धार्मिक, पुरातन ठेवा जतन करण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विशेष प्रयत्न व पाठपुरावा सुरु होता. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे व लेणी यांचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने गठीत केलेल्या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत परळी येथील केदारेश्वर व महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार राज्य सरकारने या कामासाठी ६ कोटी ५४ लाख ३० हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. 

मंजूर निधीमधून या मंदिरांच्या जीर्णोद्धारासह विविध विकासात्मक कामे केली जाणार आहेत. केदारेश्वर व महादेव मंदिर हा पुरातन ऐतिहासिक, धार्मिक अनमोल ठेवा जतन व संवर्धन करण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध झाल्याबद्दल परळी खोऱ्यातील जनतेसह राज्यभरातील भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्रोही संमेलनाच्या संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कटगुण येथे केले महात्मा फुले यांना अभिवादन
पुढील बातमी
म. फुले, संत गाडगे बाबा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे समाज व्यवस्थेला मार्गदर्शक विचार देणारे दीपस्तंभ - प्रा. श्रीधर साळुंखे; 'चला करुया जागर महापुरुषांच्या विचारांचा' उपक्रमाचा शाहूपुरीत शुभारंभ

संबंधित बातम्या