‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो’चे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : देशात दरवर्षी जितक्या वाहनांची विक्री होते, तितकी काही देशांची लोकसंख्या देखील नाही. वाहन उद्योगाची उल्लेखनीयरित्या वार्षिक बारा टक्के दराने वाढ होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारत मोबिलिटी ग्लोबल अर्थात ‘ऑटो एक्स्पो’चे उद््घाटन करताना सांगितले.

जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताला ओळखले जाते. जेव्हा देश अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पहिल्या तीन क्रमांकाच्या आत येईल, त्यावेळी वाहन उद्योगाची कितीतरी जास्त प्रगती झालेली असेल, असेही मोदी यांनी नमूद केले.

देशाचा वाहन उद्योग वेगाने प्रगती करीत आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी तो सुसज्ज सुद्धा आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, वार्षिक १२ टक्के दराने या उद्योगाची वृद्धी होत आहे. काही दशकापूर्वीपर्यंत रस्ते मोठे आणि चांगले नसल्यामुळे लोक वाहनांची खरेदी करीत नसत. मात्र पायाभूत विकासाच्या कामांवर आमच्या सरकारने व्यापक प्रमाणात काम केले आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी ११ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

देशात आता मल्टी लेन महामार्ग, एक्सप्रेस वे यांचे जाळे पसरत आहे. इकडे ’भारत मोबिलिटी एक्स्पो’ची व्याप्ती वाढत आहे. गतवर्षी ८०० पेक्षा जास्त कंपन्यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला होता. यावेळी ही संख्या वाढली आहे. यंदा भारत मंडपम् याठिकाणीच नव्हे तर द्वारका येथील यशोभूमी आणि ग्रेटर नोएडा येथील ‘इंडिया एक्स्पो’ केंद्रात देखील हे प्रदर्शन भरवण्यात आले. सहा दिवस चालणाऱ्या वाहन प्रदर्शनाला लाखो लोक भेट देणार आहेत. याठिकाणी अनेक नव्या वाहनांचे लाँचिंग होणार आहे.

भारतीय कंपन्यांना संधी

भारत मोबिलिटी शोमध्ये टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा, टोयोटा किर्लोस्कर मोटार, हुंदाई मोटार इंडिया, किया इंडिया, स्कोडा, फोक्सवॅगन इंडिया, बीएमडब्लू, मर्सिडीज बेंज, पोर्श इंडिया, बीवायडी यासारख्या कंपन्या सामील होत आहेत. शिवाय दूचाकी श्रेणीत टीव्हीएस मोटार कंपनी, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, होंडा मोटारसायकल, सुझुकी मोटारसायकल, यामाहा इंडिया तर व्यावसायिक श्रेणीत व्हॉल्वो आयशर कमर्शियल, अशोक लिलँड, जेबीएम, कमिन्स इंडिया यासारख्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. शिवाय एथर एनर्जी, ओला इलेक्ट्रिक, टीआय क्लीन मोबिलिटी, इका मोबिलिटी, व्हिएतनाम येथील विनफास्ट यासारख्या ई गाड्या तयार करणाऱ्या कंपन्या आपले मॉडेल आणि तंत्रज्ञानाचे सादरीकरण करतील.

मागील बातमी
अमिताभ आणि ऐश्वर्याशी होणाऱ्या तुलनेवर अभिषेकचं वक्तव्य
पुढील बातमी
ना. अजित पवार यांचा औंध शिक्षण मंडळाच्यावतीने स्नेह पत्र देऊन गौरव

संबंधित बातम्या