सातारा : महापालिकेनंतर दि. १६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून पहिल्या टप्प्यात सातारा, पुणे, सोलापूर आदी जिल्हा परिषद यांचा समावेश असल्याचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे. या वृत्तामुळे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना केल्या आहेत.
राज्यभरात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असून आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद निवडणूकविषयी सर्वच इच्छुक उमेदवारांना आस लागून राहिली होती. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेनंतर कोणत्या एक क्षणी जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होतील असे वक्तव्य केले. त्या पाठोपाठ मंगळवार दि. १६ ते गुरुवार दि. १८ एप्रिल दरम्यान निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
यामध्ये पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. विदर्भ आणि इतर भागातील ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मर्यादा असणाऱ्या जिल्हा परिषदेची निवडणूक पहिल्या टप्प्यात महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारीला लागतात लगेच जाहीर होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून या निवडणुका होणार असून आरक्षणाची मर्यादा ओरडलेल्या जिल्हा परिषदांमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली यांचाही समावेश आहे.