सातारा : एव्हरेस्ट बेस कॅम्प... किलोमंजारो... माऊंट एलब्रुस... ही शिखरे म्हणजे गिर्यारोहकांसाठी आव्हानच. ही तिन्हीही आव्हाने अवघ्या १३ वर्षीय मुलगी पार करते, तेव्हा हे आश्चर्यच वाटते. हो, अशी आश्चर्यकारक कामगिरी साध्य केली आहे, साताऱ्यातील धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने. उणे १४ अंश सेल्सिअस तापमनात तब्बल ५ हजार ६४२ मीटर उंचीचे शिखर सर करण्याची किमया करत करत धैर्या सातारचा अभिमान बनली आहे.
साताऱ्याच्या मातीतून शेकडो कर्तबार व्यक्ती बहरल्या आहेत. त्यातील अत्यंत कमी वयााची एक म्हणजे धैर्या कुलकर्णी. धैर्याचे वय अवघे १३ वर्षांचे असून, तिने युरोप खंड व रशिया येथील माऊंट एलब्रुस हे शिखर सर केले. दोन मृत ज्वालामुखींपासून बनलेले हे शिखर असून, त्याची समुद्र सपाटीपासून उंची तब्बल ५ हजार ६४१ मीटर (१८ हजार ५१० फूट) एवढी आहे.
सगळीकडे बर्फच बर्फ, अशा स्थितीतून धैर्याचा शिखर चढण्याचा प्रवास सुरु झाला. पहिल्या दिवशी मिनरली ओडी या गावी पोहोचली. दुसऱ्या दिवशी आजाऊ येथे पोहाचत तिने ३ हजार मीटर उंचीचा ट्रेक चढाई केली. तिसऱ्या दिवशी बेस कॅम्प असलेले माऊंटन हंट येथे पोहोचली. चौथ्या दिवशी ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० मीटर इतकी उंची तिने सर केली. पाचवी दिवशी यशस्वी चढाई करत तिने माऊंट एलब्रुस शिखरावर तिरंगा फडकवला.
हे सगळे आव्हानात्मकच होते. उणे १४ अंश सेल्सिअस तापमान असल्याने प्रचंड थंडी होती. सर्वत्र बर्फच होता. हे दिव्य आव्हान तिने पूर्ण करत साताऱ्यासह भारतवासीयांची मान अभिमानाने उंचावली. हा ट्रेक गिर्यारोहक प्रियंका मोहिते यांच्या बंगळुरु येथील कंपनीतर्फे आयोजित केला होता. तिच्याबरोबर प्रियंका मोहिते व अन्य तिघे ट्रेकर सहभागी होते. धैर्या या मोहिमेतील सर्वात लहान मुलगी आहे.
धैर्याने गत एप्रिल महिन्यात एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिम पूर्ण केली होती. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी, तिही आई-वडिल, पालकांशिवाय बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या देशातील पहिली मुलगी ठरली होती. हा कॅम्प ५ हजार ५४५ मीटर इतका उंचीचा आहे. धैर्याने दररोज १० ते १५ किलोमीटर असे चालत तब्बल १४ दिवसांमध्ये १३० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. तोही मायनस १० डिग्री तापमानामध्ये. एव्हरेस्टवेळी वार्षिक परीक्षा असताना, तर आता सहामाही परीक्षा असतानाही तिने पहाटे चार वाजता तसेच संध्याकाळीही सराव केला आहे.
धैर्याने पुन्हा आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका येथील किलीमंजारो हे तब्बल ५ हजार ८५० मीटर इतकी उंची असलेले शिखर अनेक आव्हानांवर मात करत सर केलेआहे. उणे ५ ते ६ अंश सेल्सिअस तापमान, बर्फ, थंडी, ऑक्सिजन कमी, रात्रीचा प्रवास अशा स्थितीत हे शिखर तिने सर केले. हे शिखर म्हणजे गिर्यारोहकांसाठी एक आव्हानच आहे. ट्रेकिंग, गिर्यारोहण करणाऱ्यांना हे शिखर सर करण्याचे स्वप्न सतत खुनावत असते. ते तिने अवघ्या १३ वर्षी केले आहे.
सहा वर्षांपासून ट्रेकिंगचा छंद धैर्या हिला लागला आहे. तिला गिर्यारोहक प्रियंका मोहिते, गिर्यारोहक कैलास बागल यांच्या मार्गदर्शन सातत्याने लाभत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष, सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी, शिक्षिका सौ. ज्योती कुलकर्णी यांची ती मुलगी असून, त्यांची प्रेरणा तिला बळ देत असते. धैर्या ही येथील गुरुकूल स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. धैर्याचे कामगिरी संपूर्ण सातारकरांसह देशवासीयासाठी अभिमानास्पद आहे.
पालकांशिवाय उंचावतेय 'मान'
१२-१३ वर्षांची मुले पालकांच्या मागे-पुढेच करताना दिसत असतात. काही करायचे म्हटले की सोबत पालक हवेतच. मात्र, धैर्याने तिन्हीही शिखर आई-वडिलांशिवाय सर केली आहेत. स्वप्नवत भरारी घेण्यासाठी इच्छाशक्ती, जिद्द, धाडस, चिकाटी, धैर्य आदींचे बळ सोबत घेवून ती सर्वांची मान उंचावणारी कामगिरी करत आहेत. धैर्याने वयाच्या १२ वर्षी आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमंजारो शिखर सर केले होते. ते शिखर सर करणारी ती देशातील पहिली लहान मुलगी ठरली. त्यानंतर आता तिन्हे माऊंट एलब्रुस शिखर सर केले.
अजिंक्यतारा ते एलब्रुस... व्हाया एव्हरेस्ट
धैर्याची कामगिरी म्हणजे 'एव्हरेस्ट'सारखीच. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर चढाई करणारी धैर्या आता जगातील सर्वात मोठमोठी शिखरे सर करु लागली आहे. तिचा सराव म्हणजे तिच्यातील 'धैर्या'ला समाल करावा, असाच आहे. सकाळी साडेतीन- चार वाजता तिचा सराव सुरु होतो. अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर, सांबरवाडी सुळका, जानाई-मळाई डोंगर, जरंडेश्वरचा डोंगर ही तिची ट्रेकींगची ठिकाणे.पायात किलो-किलोची वजन बांधून तिचा सुरु असलेला सराव तिची जिद्द, मेहनतीचे दर्शन घडवतो.
मानलं! धैर्याने माऊंट एलब्रुस केले सर
तेरा वर्षीय धैर्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी; धैर्या बनली सातारचा अभिमान
by Team Satara Today | published on : 14 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा