टिका-टिपणीमुळे कोरेगाव मतदारसंघातील वातावरण ढवळले; पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्हीही शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांनी बाह्या सरसावल्या

by Team Satara Today | published on : 27 December 2025


सातारा : नुकताच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आ. शशिकांत शिंदे यांनी भर सभागृहात कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कारभाराचे वाभाडे काढल्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहेत. लवकर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होणार असून या निवडणुकांसाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आ. शशिकांत शिंदे, आ. महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच बाह्या सरसावल्या असल्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील भविष्यातील शीतयुद्ध थांबण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.

१९९९ साली‌ शशिकांत शिंदे यांनी जावली विधानसभा मतदारसंघातून पहिली आमदारकीची निवडणूक जिंकली. तद्नंतर त्यांनी कृष्णा खोरे जलसिंचन महामंडळात जलसंधारण मंत्री म्हणूनही काम केले. सन २००९ ते २०१४ दरम्यान ते कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. शशिकांत शिंदे दोन वेळा जावली आणि दोन वेळा गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. या संपूर्ण कालावधीत शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संघटनेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात केला होता. कोरेगाव तालुक्यातील बहुतांश विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि मार्केट समिती आपल्याच ताब्यात ठेवण्यात त्यांना चांगलेच यश मिळाले होते. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणावर रुझत असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले. अंतर्गत लाथाळ्यांना सुरुवात झाली.‌ तेथून राष्ट्रवादी काँग्रेसचे बुरे दिन खऱ्या अर्थाने सुरू झाले.

२०१९ मध्ये महेश शिंदे यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांचा प्रचंड संपर्क असून त्यांना मानणारे अनेक कार्यकर्ते, समर्थक आहेत असे असताना लोकसभा निवडणुकीतही शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे त्यांनी थेट उदयनराजे भोसले यांचा रोष ओढवून घेतला. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत आ. महेश शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांचे अत्यंत प्रामाणिकपणे काम करत त्यांना शक्य तेवढे मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला. 

आमदारकी नंतर महेश शिंदे यांची वर्णी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी लागल्यामुळे महेश शिंदे यांना वरिष्ठ नेत्यांची चांगलीच ताकद मिळाली. या ताकतीचा फायदा करून घेत त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याच ताब्यात कशा राहतील यासाठी युध्द विविध पातळीवर प्रयत्न केले. गावोगावी कार्यकर्त्यांचे माहोळ तयार केले. 

पराभवानंतरही शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाशी आपली नाळ कायम जपली मात्र सत्ता नसल्यामुळे त्यांच्याकडील कार्यकर्त्यांची संख्या रोडावली. त्याच काळात आ. महेश शिंदे यांनी विकासाचा अजेंडा हाती घेऊन राजकीय दृष्टिकोन दृढ करत मतदार संघावर आपली पकड घट्ट केली. सन २०२४ साली‌‌ झालेल्या कोरेगाव विधानसभा निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांनी अत्यंत जातीने लक्ष घातले. आ. महेश शिंदे यांची विकास कामे आणि त्यांना उदयनराजे भोसले यांची मिळालेली ताकद त्यामुळे या निवडणुकीतही शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर शरद पवार यांनी प्रथम त्यांना शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या प्रतोद  पदावर काम करण्याची संधी दिली. त्यानंतर शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी विधान परिषदेचे सदसत्व बहाल केले. त्यानंतर त्यांच्यावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

राजकीय चिखलफेक सुरू

२०२४ साली‌ कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांनी एकमेकांवर टिका- टिप्पणी करण्याची एकही संधी सोडली नव्हती. या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा मतदारसंघातील कालावधी संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही या दोन्ही शिंदे यांच्यामध्ये चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगलेला मतदारांना पहायला मिळाला होता. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आ. महेश शिंदे यांनी बाजी मारल्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात संधी मिळेल तशी राजकीय चिखलफेक सुरू झाल्यामुळे मतदारसंघातील वातावरण ढवळून जात आहे.

ज्याची सत्ता त्यांचाच कित्ता 

कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अनेक वर्ष शंकराव जगताप यांनी केले. त्या काळामध्ये विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसला बळकटी देण्यासह मतदारसंघातील विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले. शंकराव जगताप यांच्या दूरदृष्टीमुळे पक्षाने त्यांना अनेक मोठ्या पदांवर काम करण्याची संधी दिली. त्यांच्या पश्चात शालिनीताई पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र विधानसभा मतदार पुनर्रचनेत जावली विधानसभा मतदारसंघ सातारा विधानसभा मतदारसंघाशी जोडला गेल्यामुळे शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आणले. तद्नंतर झालेल्या सलग दोन विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे हेच विजयी झाले. जसा काळ बदलत गेला तशी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सूत्रे बदलत गेली. सद्य परिस्थितीत ज्याची सत्ता त्यांचाच कित्ता असे एक नवीन सूत्र मतदारसंघामध्ये तयार होऊ लागले.

पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांचे प्रयत्न 

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बहुतांश सत्ता स्थाने हातची निघून गेल्यामुळे भविष्यात होणाऱ्या कोरेगाव पंचायत समितीसह जिल्हा परिषदांच्या विविध गटांवर वर्चस्व मिळवण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांनी तुतारी फुंकली आहे. दोन्हीही शिंदे गटांच्या कार्यकर्ते समर्थकांनी या निवडणुकांसाठी आत्तापासूनच बाह्या सरकवल्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील भविष्यात होणारे शीतयुद्ध थांबवण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नववर्षाच्या पूर्वसंध्येपासूनच सातारा पोलिसांचा तळीरामांवर वॉच; चारभिंती, कास, ठोसेघर मार्गावर होणार कडक तपासणी

संबंधित बातम्या