८ ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीर; ५ हजार बाटल्या रक्त संकलनाचा मानस

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचा उपक्रम; सचिव संजीव माने यांचे आवाहन

by Team Satara Today | published on : 06 August 2026


सातारा : ऑगस्ट क्रांतिदिन आणि आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीने शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. एम.आय.डी.सी. सातारा येथील समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर (लोकमान्य विद्यामंदिर) प्रांगणात सकाळी ६:३० ते रात्री ८:३० या वेळेत हे शिबीर पार पडणार असल्याची माहिती संस्था सचिव संजीव माने यांनी दिली.

​राज्यात जाणवणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी १३२६ बाटल्या रक्त संकलित करून संस्थेने सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रक्तदान शिबीराचा बहुमान मिळवला होता. यंदा ५ हजार बाटल्या रक्त संकलित करून पश्चिम महाराष्ट्रात नवा विक्रम रचण्याचा संस्थेचा मानस आहे. शिबीराच्या यशस्वीतेसाठी ‘एक विद्यार्थी-एक रक्तदाता’ ही संकल्पना राबवली जात असून निबंध व पोस्टर स्पर्धांच्या माध्यमातून घरोघरी जनजागृती केली जात आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील तरुण मंडळे, आजी-माजी विद्यार्थी संघ आणि आमदार महेशदादा शिंदे मित्र समूह सक्रियपणे सहभागी झाले आहेत.

​या रक्तदान शिबीराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी आमदार महेशदादा शिंदे, आमदार अरुण लाड, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र समरसता प्रमुख मुकुंदभाऊ आफळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले, सुनील काटकर आणि संदीपभाऊ शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

​शिबीराच्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर, स्वच्छता व सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. सहभागी रक्तदात्यांसाठी मोफत अल्पोपहार तसेच ‘जीवनदान गौरव भेटवस्तू संच’ आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन संजीव माने यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अन्न व औषध प्रशासनाची कराडमध्ये धडक कारवाई; दोन हॉटेल्स सील, तीन आस्थापनांवर दंडात्मक कारवाई

संबंधित बातम्या